वर्धा : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून येणारा देशी-विदेशी मद्यसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पकडून दोघांना अटक केली. ही कारवाई भिडी परिसरात १२ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
अजय अनंता नागपुरे (१९), संविधान संदीप मस्के (२०) दोन्ही रा. वायगाव (नी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यातील देवळी हद्दीत दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने भिडी गावाजवळ नाकाबंदी केली असता एम.एच.३२ क्यू. ४८१६ क्रमांकाचे मालवाहू वाहन भरधाव येताना दिसले. पोलिसांनी वाहनाला थांबविले असता वाहनात दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बारमधून दारूसाठा आणल्याने बार मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात संतोष दरगुडे, विकास अवचट, राकेश अष्टानकर, हर्षल सोनटक्के यांनी केली.
दुचाकीसह दीड लाखांचा दारूसाठा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथील संत चोखोबा वॉर्डात छापा मारला असता आकाश उर्फ लल्ला शिंदे हा एम.एच,३२, ए.पी. ३४४८ क्रमांकाच्या दुचाकीने दारू आणून घरात लपवून ठेवत असल्याचे समजले. घराची झडती घेतली असता तो व त्याची आईच्या व प्रेम प्रकाश शिंदे यांच्या संगनमताने विक्री करीत असल्याचे समजले. पोलिसांनी प्रेमप्रकाश किसनलाल शिंदे, ममता धनराज शिंदे यांच्या ताब्यातून ४८ हजार ७५० रुपयांचा दारूसाठा व मालवाहू वाहन असा १ लाख ६५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सचिन इंगोले, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले यांनी केली.