वर्धा : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात होणाऱ्या विविध सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून तब्बल ३४९ सराईत गुन्हेगारांना गणपती विसर्जन होईस्तोवर हद्दपार करण्याच आदेश पोलीस विभागाने पारित केला आहे. पोळा, गणेशोत्सव शांतते पार पडावा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दोन वर्षे जाहीर कार्यक्रमांना मर्यादा होत्या. मात्र, यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होणार आहेत. उत्सव काळात असामाजिक तत्वांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांनी अशांतता निर्माण करु नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंबंधिचा प्रस्ताव चारही उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर ठाणेदारांनी तयार केला होता. त्यानुसार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना गणेशविसर्जनापर्यंत जिल्ह्यात वस्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
रामनगर हद्दीतील तीन टोळ्या हद्दपार
सण उत्सव काळात शहारात शांतता राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कलम ५५ अंतर्गत रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्या ३ सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.