लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावात जलयुक्त शिवारंतर्गत झालेल्या कामामधून ९५ हजार ४७३ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ मोठ्या संख्येने शेतकºयांना मिळत आहे.पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे, अस्तित्त्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांच्या पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे व पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. २०१५ पासून सुरू करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात उत्तम पद्धतीने राबविल्या जात आहे. कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. या सर्व विभागाच्या नियोजनामुळे जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल जिल्ह्यात सध्या बघावयास मिळत आहे. २०१५-१६ मध्ये आठ तालुक्यातील २१४ गावांची निवड करण्यात आली. २१४ गावात विविध यंत्रणांमार्फत २,८०८ कामे करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम पाहता जिल्ह्यातील २०१५-१६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली २१४ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहेत. जिल्ह्यात या वर्षात ४१ हजार २९० हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पावसाच्या खंड काळात पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे. पावसाचे पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पद्धत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्यूट्रल टक्केवारी होय. सन २०१६-१७ मध्ये २१२ गावाची निवड करण्यात आली. या गावात २,३२३ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी २,२२८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून ५४ हजार १८३ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. सदर वर्षात निवडण्यात आलेल्या २१२ गावांपैकी १४३ गावे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली. तर ६१ गावे ८० टक्क्यांच्या वर वाटर न्युट्रल झाली आहेत. गत दोन वर्षांत जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामामुळे जिल्ह्यात भाजीपाला पीक, फळपीक लागवड वाढली आहे. शिवाय रबी पिकाच्या क्षेत्रात १५ हजार हेक्टरने वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.सन २०१७-१८ मध्ये १३८ गावांची निवड करून १,४०० कामे प्रस्तावित केली आहेत. काही कामे सुरु झाली असून कामे पूर्ण झाल्यावर ३० हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण होणार आहे. गत तीन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ९५ हजार ४७३ हेक्टर संरक्षित सिंचनामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळाले.
जिल्ह्यातील ३५७ गावांची ‘वॉटर न्युट्रल’कडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:37 PM
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार ठरलेय फायद्याचे : जिल्ह्यातील रबीचे क्षेत्रही वाढल्याचा प्रशासनाचा दावा