सावंगी रुग्णालयात सुरक्षित मातृत्व दिन कार्यक्रम : एक लाखाची आरोग्य सेवा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सावंगी (मेघे) रुग्णालयात मागील १६ महिन्यांत टेस्ट ट्युब बेबी प्रक्रियेद्वारे जुळ्यांसह ३८ बालकांचा जन्म झाला आहे. सुरक्षित मातृत्व दिन कार्यक्रमात दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांच्या हस्ते या बालकांना एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय सेवा नि:शुल्क देणाऱ्या आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व वर्धा टेस्ट ट्युब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सागर मेघे तर अतिथी म्हणून जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, विशेष कार्य अधिकारी अभ्यूदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबाजी घेवडे, वर्धा टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या संचालक डॉ. दिप्ती श्रीवास्तव, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौनित्रा इनामदार, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, परिचर्या शिक्षण समन्वयक मनीषा मेघे, परिचर्या संचालक सिस्टर टेसी सॅबेस्टीयन आदी उपस्थित होते. याप्रसंगी सावंगी रुग्णालयात टेस्ट ट्युब बेबी प्रक्रियेद्वारे जन्मलेल्या पालकांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अपत्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत विनामूल्य सेवा देणाऱ्या दत्तात्रय आरोग्य विमा कार्डची भेट देण्यात आली. सोबतच ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सुलोचना सावरकर सालोड, मंजू शेंडे नाचणगाव, सुनीता देवगडे निंबोली, प्रतिभा चलाख येळाकेळी या आशा कार्यकर्त्यांना राधिकाबाई मेघे स्मृती रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. सौनित्रा इनामदार यांनी ‘गर्भाशयाचे आजार व लॅप्रोस्कोपीद्वारे उपचार’, डॉ. अर्पिता जयस्वाल यांनी ‘वेदनारहित प्रसूती’ या विषयांची मांडणी केली. प्रारंभी अभ्यूदय मेघे यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. दिप्ती श्रीवास्तव यांनी केले. संचालन डॉ. मोनिका कोतपल्लीवार यांनी केले तर आभार विनया भरणे सिन्हा यांनी मानले. कार्यक्रमात टेस्ट ट्युब बेबींचे पालक, गर्भवती माता व जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सावंगीत १६ महिन्यांत ३८ टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म
By admin | Published: July 13, 2017 12:50 AM