महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या काेविड संकटात कोविड मृत्यू रोखण्यासाठी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस हाच खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३ लाख ८२ हजार ७६८ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ६ लाख ९१ हजार ८८१ लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट आहे. २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत उद्दिष्टापैकी ३ लाख ९ हजार ११३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८८,१८९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. ४४.६८ टक्के ग्रामीण नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असला तरी अजूनही ३ लाख ८२ हजार ७६८ लाभार्थ्यांनी कोविडची लस घेतलेली नाही. त्यामुळे कोविडची तिसरी लाट ओढवण्यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीबाबत प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.
१०० टक्के व्हॅक्सिनेट गावाला मिळणार पुरस्कार- गावपातळीवर लसीकरणाला गती मिळत प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाकडून पाच लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतीला आता बक्षीसही मिळणार आहे. बक्षीसाची रक्कम गाव विकासावर खर्च करता येणार आहे.
सर्वाधिक लाभार्थी वर्धा तालुक्यात- जिल्ह्यात आठ तालुके असून, एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. हिंगणघाट तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील ८३ हजार ६७८ लाभार्थी, वर्धा तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील १ लाख ८३ हजार २७२ लाभार्थी, कारंजा (घा.) तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमधील ६८ हजार ९०७ लाभार्थी, आष्टी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीमधील ४९ हजार ६८८ लाभार्थी, देवळी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीमधील ८० हजार २३० लाभार्थी, आर्वी तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीमधील ७३ हजार ४४५ लाभार्थी, सेलू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधील ७० हजार ७९७ लाभार्थी तसेच समुद्रपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमधील ८१ हजार ४०९ लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट आहे.