पिंजरे, जाळ्यांचा लावला ‘ट्रॅप’ : अस्वलीसह दोन पिलांचाही शोध सुरू आष्टी (शहीद) : जुलै २०१६ ते जानेवारी २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल आठ शेतकऱ्यांवर अस्वलीने हल्ला चढविला. या अस्वलाच्या शोधार्थ पुन्हा कोम्बींग आॅपरेशन राबविले जात आहे; पण अद्यापही अस्वल व तिच्या दोन पिलांचा शोध लागत नसल्याने सारेच हतबल आहे. या शोध कार्याकरिता दोन तुकड्या तयार करण्यात आल्या. १५ कि़मी अंतर फिरुन जंगलात शोधमोहिम करण्यात आली. जागोजागी पिंजरे लावण्यात आले. बोरीचे डाखोळे, गुळ, खडका, मोहा असे पदार्थ अस्वलीला आकर्षित करण्यासाठी ठेवण्यात आले. यानंतर अस्वल मिळाली नाही. जंगलाला लागून असलेल्या शेताजवळ जाळे लावण्यात आले आहे. बोरखेडी, थार बीटमध्ये रात्रीला शेतकऱ्यांच्या शेतातील मळ्यांवर वनरक्षकांची गस्त लावण्यात आली. पहाटे ५ वाजतापासून रात्री ७ वाजेपर्यंत कोम्बींग आॅपरेशन करण्यात येते. गावकरी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य, सरपंच, पोलीस पाटील यांना १७ जानेवारीला वनविभागाच्या कार्यालयात बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. यात मोहिमेबाबत चर्चा व उपायांची माहिती देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतामध्ये एकट्याने जावू नये. शेतात जाताना कुऱ्हाडीच्या दांड्याला रॉकेलचा टेंभा, मोठी काडी सोबत ठेवावी. अस्वल दिसताक्षणीच ५० मीटर दूर पळून जात तिचा प्रतिकार करण्याच्या सूचना ग्राम्स्थांना देण्यात आल्या. थार, बोरखेडी, मुबारकपूर, मोई जंगलात मोठ्या प्रमाणात शेती आहे. मात्र अस्वलीच्या धाकाने पीक काढणे ठप्प आहे. गावकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे अस्वलीला ठार मारण्याचा प्रस्ताव वर्धा उपवनसरंक्षक यांच्याकडे पाठविला आहे. मात्र अस्वलीला मारता येत नसल्याने गावकऱ्यांना समजावून सांगणे हाच उपाय आहे. या अस्वलीचा शोध घेणे वनविभासमोर आव्हान ठरत आहे.(तालुका प्रतिनिधी) वर्धा वनविभागात १४ अस्वलींची नोंद जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुका जंगलव्याप्त आहे. येथे आतापर्यंत एकूण १४ अस्वल असल्याची नोंद वनविभागात झाली आहे. मागील वर्षी कारंजा तालुक्यात अस्वल व तिच्या २ पिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. आष्टी वनविभागात एक अस्वल व २ पिल्ले आहेत. या तिघांनी तर अक्षरश: कहर माजविला आहे. त्यामुळे अस्वल शोधण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहेत. वनविभागाचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न १ आॅगस्ट २०१६ ला अस्वलीने प्रल्हाद पवार यांच्यावर हल्ला केला. तेव्हा मोई येथील संतप्त गावकऱ्यांनी आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्य राखीव दल वनविभागाचे संपूर्ण कर्मचारी अस्वलीच्या शोधात आहे. मात्र वारंवार शोधमोहिम राबवून पूर्ण झाल्यावर पुन्हा अस्वल दिसते व हल्ले करण्यात सक्रीय होते. यासाठी प्रशासनही हतबल झाले आहे.
एसआरपीच्या २७ जवानांसह ४२ जण जंगलात
By admin | Published: January 16, 2017 12:43 AM