महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण ७८२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे. सहा पदरी असलेल्या या महामार्गावर पाच मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्यासाठी नऊ उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. शिवाय ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेत. पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत. एकूणच या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अतिजलदगतीने तसेच अवघ्या काही तासांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
तीन तालुक्यांतून गेलाय समृद्धी महामार्ग- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून गेलेला आहे. वर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली, लोणसावळी तर सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) तसेच आर्वी तालुक्यातील बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या गावांतून हा महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
महामार्ग सहापदरी - वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाची लांबी ५८ किमी तसेच रुंदी १२० मीटर असून तो दोन-चार नव्हे तर तब्बल सहापदरी आहे. त्यासाठी २ हजार ७६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
समृद्धी मुंबई-नागपूर या महानगरांना जोडणारा- वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील एकूण ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेला हा महामार्ग राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि उपराजधानी असलेल्या नागपूर या महानगरांना जोडणारा आहे.