लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार १८० शिधापत्रिकाधारक असून, यावर तब्बल ११ लाख ३१ हजार ४६१ व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी नवीन शिधापत्रिका प्राप्त करू इच्छिणाऱ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवेदकाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. पण ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पण केवळ वातानुकूलित कक्षात बसून आपणच सर्व कामे करतो, असा आव आणणारे हे अधिकारी सध्या केवळ आश्वासनच देत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
नागरिकांना झिजवावे लागतेय शासकीय कार्यालयांचे उंबरठे- ऑनलाईन पद्धतीने नोंद घेणारे संकेतस्थळ बंद असले तरी नागरिकांच्या अडचणीत भर पडू नये, म्हणून तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात नवीन शिधापत्रिकेबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पण संकेतस्थळ सुरू झाले काय याची विचारणा करण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठेच झिजवावे लागत असल्याचे वास्तव आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हतबल नागरिकांचा रोष- संकेतस्थळ आज सुरू झाले असावे, या आशेने तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात येरझारा मारणाऱ्यांत वृद्धांचीही मोठा संख्या असून संकेतस्थळच बंद असल्याने सध्या त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - नाहक त्रास सहन करून हतबल झालेले नागरिक सध्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मुंबई दरबारातील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटच मोडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
आपण आवश्यक कागदपत्रे संलग्न करून नवीन शिधापत्रिकेसाठी रीतसर अर्ज केला आहे. पण ऑनलाईन नोंद घेण्यासाठीचे संकेतस्थळच बंद असल्याने ते सुरू झाल्यावर नोंदणी होईल असे सांगण्यात आले. नागरिकांची समस्या लक्षात घेता अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष देत समस्या निकाली काढावी.- राखी वरभे, अर्जदार.
संकेतस्थळ बंद असून ऑनलाईन पद्धतीने नोंद घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठांना याची माहिती दिली आहे. शिवाय पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच योग्य कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.- प्रज्वल पाथरे, पुरवठा अधिकारी, वर्धा.