लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोवर रुबेला लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील ४ लाख ४६ हजार मुला-मुलींना गोवर रुबेला लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच महिला व बाल कल्याण विभाग आणि खासगी वैद्यकीय व्यवसायिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या पाल्याला सदर लस देवून मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.आय.एम.ए. सभागृहात गोवर रूबेला लसीकरण मोहीम व राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक व कार्यशाळा पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, जि.प. सभापती जयश्री गफाट, सोनाली कलोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. गर्ग, डॉ. उदय मेघे, डॉ. एस. आर. ठोसर, डॉ. सचिन पावडे, डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. अजय डवले, डॉ. राज गहलोत, डॉ. विनोद वाघमारे, डॉ. सचिन दामके, अनिल नरेडी, श्रीनिवास लेले, सुनीता इथापे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना गोवर रुबेला लस द्यायची आहे. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमात सदर लसीचा आंतर्भाव करण्यात येणार आहे. गोवरमुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी व गर्भवती स्त्रियांना रुबेला या आजाराचा संसर्ग झाला तर अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष होऊ शकतात. ज्यात अंधत्व, बहिरेपण आणि हृदयविकृतीचा समावेश आहे. गोवर रुबेला लसीकरण पहिल्या टप्प्यात सर्व शाळेत जाणारे १५ वर्षाआतील लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडीतील ९ महिने ६ वर्ष वयोगटातील बालकांना व शाळा बाह्य लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील ४ लाख ४६ हजार मुला-मुलींना लसीकरण करावयाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले. संचालन दिलीप रहाटे व विजय जांगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. राज गहलोत यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. लक्षद्वीप पारेकर, डॉ. विनीत झलके आदींची उपस्थिती होती.सर्वांनी पुढे यावे - गुल्हाणेसर्व शाळा, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागातील सर्व कर्मचाºयांनी एकजुटीने काम करुन शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत ही मोहीम पोहचविण्यात यावी, असे आवाहन याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.
४.४६ लाख बालकांना गोवर रुबेला लस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:35 AM