अमोल सोटे ।आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर संपूर्ण देशात परिचित झालेल्या आष्टी शहराचा आराखडा नसल्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती. ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने शहर विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी उपाययोजना करायला प्रारंभ केला. निविदा निघताच ती नाशिक येथील कंपनीला प्राप्त झाली. सदर कंपनीने गत दोन महिन्यामध्ये सर्व्हे करून आष्टी शहर विकास आराखडा तयार करून दिला आहे.१९७२ साली आष्टी शहरातील घरे, खाली जागा, शासकीय इमारती, रस्ते, सार्वजनिक स्थळांसह सर्व बाबी समाविष्ठ करून सर्व्हे केला होता. त्यावेळी आष्टी कारंजा (घाडगे) तालुक्यात समाविष्ट होता. एक गाव म्हणून अवघ्या १६ हजार मध्ये संपूर्ण मोजणीसह आराखडा तयार झाला होता. कालांतराने १९८४ साली आष्टीला तालुक्याचा दर्जा मिळाला. लोकसंख्या वाढल्याने शेतजमिनीचे ले-आऊट पडून विस्तार झाला. घरांची संख्या आणि अतिक्रमण झपाट्याने वाढले. सन २०१५ साली आष्टी नगरपंचायत झाली.त्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून कामे करण्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. यासाठी ई-निविदा निघाली. नाशिक येथील अक्षय इंजिनिअर्स कंपनीला ४८ लाखांध्ये काम मिळाले. कंपनीचे व्यवस्थापक साहेबराव पवार यांनी २० कर्मचाºयांची चमू कार्यरत केली. शहराच्या प्रत्येक घराचा, खाली जागेचा, सार्वजनिक रस्ते, इमारती याचे मोजमाप केले. त्यानंतर उतार काढण्यासाठी कंटूर सर्व्हेही करण्यात आला. भूमि अभिलेख कार्यालयात असलेला जुना नकाशा गृहित धरून सर्व्हे झाला. यामध्ये नवीन विस्तार वाढला. त्याचाही समावेश करण्यात आला आहे. मूळ वस्तीमधील रस्त्यांवर असणारे अतिक्रमण काढण्यासाठी सीमा कायम करण्यात आल्या आहे.राष्ट्रीय महामार्गासाठी अतिक्रमण काढणारशहर विकास आराखड्यातील मोजणीमुळे राष्ट्रीय महामार्गासाठी जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. बसस्थानकाच्या परिसराला लागून असणारे सर्व दुकाने हटणार आहे. न्यायालय इमारत बांधकाम सुरू आहे. त्यांच्याही समोरील दुकाने हटणार आहेत.बाकळी नदीचे पात्र कायम राहणारबाकळी नदीच्या भागात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी पात्र अरूंद आहे. या झालेल्या सर्वेक्षणामध्ये नदीचे पात्र कायम राहणार आहे. त्यामुळे शेतजमिनीवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.कंटूर सर्व्हे करण्यात आल्याने चढ-उतारावरील जमिनीची पातळी निश्चित झाली आहे. आष्टी हे उंच भागावर असलेले शहर आहे. वातावरणासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे. शहराच्या तीन बाजुला उंच टेकड्या आहेत. मुळ वस्ती उंचावर आहे. काही भाग उतार आहे. कंटूर सर्व्हेमुळे पाईपलाईन टाकताना मदत होणार आहे.
४५ वर्षांनंतर शहर विकास आराखड्याची जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:42 PM
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर संपूर्ण देशात परिचित झालेल्या आष्टी शहराचा आराखडा नसल्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती.
ठळक मुद्देसर्वे पूर्ण, अतिक्रमण काढणार : सर्वेक्षणावर ४८ लाखांचा खर्च