वर्धा : महाराष्ट्र राज्यात एकल वापर प्लास्टिक बंदी लागू असतानाही त्याचा वर्धा व हिंगणघाट शहरात वापर होत असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या हिंगणघाट आणि वर्धा नगरपालिका प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवून तब्बल ४.५२ टन प्रतिबंधित प्लॅास्टिक जप्त केले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर यांच्या अधिकाऱ्यांनी वर्धा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेत वर्धेतील संकुल इंटरप्रायजेस, लक्ष्मी इंटरप्रायजेस व सिमरन प्लास्टिक ॲण्ड डिसपोजल या तीन व्यावसायिक प्रतिष्ठानांत धडक कारवाई करून तब्बल २.३५ टन प्रतिबंधित प्लॉस्टिक जप्त केले आहे. हे प्लॉस्टिक वर्धा नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तर हिंगणघाट येथे हिंगणघाट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेत अग्रवाल प्लाॅस्टिक ॲण्ड डिसपोजल आणि आदीनाथ ट्रेडर्स या व्यावसायिक प्रतिष्ठानात छापा टाकून २.१७ टन प्रतिबंधित प्लाॅस्टीक जप्त केले आहे. जप्त केलेले हे प्रतिबंधित प्लॉस्टिक हिंगणघाट नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरचे क्षेत्र अधिकारी मनोज वाटाणे, विनोद शुक्ल यांनी हिंगणघाट व वर्धा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेत केली.
दोषी आढळलेल्यांना ठोठावला दंड
प्रतिबंधित प्लॉस्टिकची विक्री व वापर केल्या जात असल्याचा ठपका ठेऊन दोषी आढळलेल्या हिंगणघाट आणि वर्धा येथील संबंधित व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोषी व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले.