वर्धा : हिंगणघाट तालुक्यात शनिवारी सायंकाळी जोराचा पाऊस झाला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चाणकी (कोरडे) या गावातील आजोबासह नात नाल्याच्या पुरात वाहून गेले होते. तब्बल ४८ तासांनंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे.
चानकी (कोरडे) गावातील लाला सुखदेव सुरपाम (५०) आणि त्यांची नात नायरा साठोणे (९) हे दोघे शनिवारी कानगाव येथे बाजारासाठी गेले होते. त्यावेळी अल्लीपूर परिसरात मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी बाजार झाल्यानंतर आजोबा व नात गावी परत जात होते. ते नाल्यावरील जीर्ण पुलावर पोहोचले. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. लाला सुरपाम व नायरा नाल्यावरील जीर्ण पुलावरून जात असताना दोघेही पुरात वाहून गेले होते. तब्बल ४८ तास उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
नाल्यावरील पूल काही वर्षांपासून जीर्ण झाला आहे. पुलाची उंचीसुद्धा कमी आहे. त्यामुळे पुलावरून जास्त पाणी असल्यामुळे दोघेही वाहून गेले. नवीन पूल तयार करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला साकडे घातले होते. मात्र नवीन पूल झाला नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे तक्रारीसुद्धा केल्या होत्या. तरीही पूल दुरुस्ती व नवीन बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस आल्याने आजोबासह नात वाहून गेली.
अधिकाऱ्यांची भेट, शोध कार्य सुरूचघटना घडल्यानंतर पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, अल्लीपूरचे ठाणेदार प्रफुल डाहुले, हिंगणघाटचे नायब तहसीलदार सागर कांबळे, भाजप नेते राजेश बकाने यांनी घटनास्थळी भेट दिली. नागपूर येथील येथील एनडीएआरएफची चमू नात व आजोबाचा शोध घेत आहे. मात्र, ४८ तास लोटूनही त्यांचा शोध लागला नाही. अद्याप शोध कार्य सुरू आहे.