लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १० जानेवारीपासून वयोवृद्ध तसेच हेल्थ केअर आणि फ्रन्टलाईन वर्करला कोविड लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १० हजार ९२९ लाभार्थ्यांना लसीचा बुस्टर डोस देण्यात आला असला तरी यात ४९.१३ टक्के वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. तर अनेक हेल्थ केअर अन् फ्रन्टलाईन वर्कर कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यास दुय्यम स्थानच देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोविड लसीचा बुस्टर डोस घेणाऱ्यांत ३ हजार ७५६ हेल्थ केअर वर्कर, १ हजार ८०३ फ्रन्टलाईन वर्कर तसेच तब्बल ५ हजार ३७० वयोवृद्धांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या कोविडची तिसरी लाट उच्चांक गाठत असून, लसीचा बुस्टर डोस हा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्तच असल्याचे सांगण्यात येते.
का नाही घेतला बुस्टर?मागील काही दिवसांपासून कामाचा व्याप वाढला आहे. याच व्यस्ततेमुळे आपण कोविडचा बुस्टर डोस अद्यापही घेतला नाही; पण लवकरच आपण कोविड लसीचा बुस्टर डोस घेणार असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर आरोग्य यंत्रणेतील एका परिचारिकेने सांगितले.कोविडची दुसरी लाट उच्चांक गाढत असल्याने तसेच बदलत्या वातावरणामुळे रुग्ण तपासणीचे काम वाढले आहे. रुग्णसेवेला प्राधान्य दिले जात असल्याने आपण अद्याप कोविड लसीचा बुस्टर डोस घेतला नाही. लवकरच बुस्टर डोस घेऊ, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर आरोग्य यंत्रणेतील एका डॉक्टरने सांगितले.
लाभार्थ्यांना देण्यात येणारी कोविडची प्रतिबंधात्मक लस किंवा लसीचा बुस्टर डोस हा कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मनात कुठलीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी. लस हा कोविड संकटात खबरदारीचा प्रभावी उपाय आहे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.