वर्धा : वाघांचा हब अशी विदर्भाची ओळख. शिवाय वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पात बीटीआर-३ कॅटरिना, बीटीआर-७ पिंकी या वाघिणींसह १४ प्रौढ व छोट्या वाघांचे वास्तव्य आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात मागील पाच वर्षांत तब्बल पाच भटक्या वाघांची नोंद घेण्यात आली आहे.
बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीची मुलगी बीटीआर-७ पिंकी या वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी वर्ध्याचा वन विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. इतकेच नव्हे, तर अतिशय चपळ आणि देखणी असलेल्या पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची दिवाळी यंदा जंगलातच राहिली. असे असले तरी नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ ऑक्टोबर २०१८ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या एका तरुण भटक्या वाघाने ४५० हून अधिक किमीचा प्रवास पूर्ण करून मेळघाट गाठल्याचे वास्तव आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या रामदेगी परिसरात वास्तव्य असलेली मयुरी नामक वाघीण व मटकासूर नामक वाघ नेहमीच वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यात एंट्री करतो.
मागील पाच वर्षांत या दोन्ही भटक्या वाघांनी वेळोवेळी समुद्रपूर तालुका गाठला आहे, तसेच वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या पवनार येथे १८ मार्च २०२२ मध्ये एक भटका वाघ ट्रेस झाला होता. याच वाघाने पवनार शिवारात काही पाळीव जनावरांची शिकार केल्यावर आजीच्या दिशेने वाटचाल केली होती; पण नंतर पुन्हा यू-टर्न घेत तो पवनार येथे परतला होता. त्यानंतर हा वाघ आपल्या र नैसर्गिक अधिवासाकडे परतला.
जिल्ह्यातील आठही वनपरिक्षेत्रात व्याघ्र दर्शनाची नोंद घेण्यात आली आहे. तर, देशातील सर्वात छोटा बोर व्याघ्र प्रकल्प सेलू तालुक्यात असल्याने जिल्ह्यातील ४०, ५५९.३८ हेक्टरवर नेहमीच टायगरची मूव्हमेंट राहते. शिवाय भटके वाघ नेहमीच वर्धा जिल्ह्यात एंट्री करतात.
- अमरजित पवार, सहर, वनरक्षक वर्धा