वर्धा : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावरुन वाहनाऱ्या पाण्यात ५ दुचाकी वाहने आणि २ सायकली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. ही वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकल्याने त्यावर महामार्गाचा गाळ पडल्याने वाहने गाळात दाबली. जेसीबीच्या मदतीने दोन दुचाकी अन् एक सायकल काढण्यात आली तर इतर वाहने अजूनही मिळाली नसल्याची माहिती आहे.
शेकापुर आणि मांडवा या दोन गावादरम्यान जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास काम करणाऱ्या मजुरांनी ५ दुचाकी वाहने उभी करून ठेवली होती. त्याच ठिकाणी इतर २ मजुरांच्या सायकल उभ्या होत्या. पुलाजवळ वाहने ठेवून हे सर्व समृद्धीच्या कामावर पायदळ गेले होते. दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे समृद्धी मार्गावर पडणाऱ्या पावसाचे पाणी उंचावरून खाली वेगात वाहत आले. पाण्यासोबत समृद्धी मार्गाच्या कडेला असलेली माती दगड देखील खाली आले.
पाण्याच्या प्रवाहात पूलाशेजारी उभी असलेली वाहने चक्क वाहत गेली. रस्त्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या खोल भागात महामार्गाचे पाणी जाऊन साचले. त्या पाण्यात वाहत गेलेली वाहने खड्डयात जाऊन पडली. त्या वाहनांवर महामार्गाच्या पाण्यासोबत वाहत आलेली माती व दगड पडल्याने सर्व वाहने खड्डयांत फसली. मजूर परत आले तेव्हा त्यांना त्यांची वाहने दिसून आली नाही. सर्व मजूर रविवारपासून वाहनांचा शोध घेत होती. खड्ड्यातील गाळत फसलेल्या दोन दुचाकी व एक सायकल जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. तसेच इतर तीन दुचाकी व एका सायकलचा शोध सुरु आहे.