आतापर्यंत १४ कांदा उत्पादकांनी घेतला योजनेचा लाभ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कांदा पीक लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यात शेतकरी उत्पन्न घेत असून कांदा दीर्घकाळ टिकविण्याकरिता कांदाचाळ उभारणी आवश्यक आहे. अशाच कांदाचाळ उभारण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास अभियान या योजनेंतर्गत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ आजपर्यंत जिल्ह्यातील १४ शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांनी यातून कादांचाळची उभारणी केली आहे. या कांदाचाळीत २३० मेट्रीक टन कांद्याची साठवणूक केली जाते. सन २०१७-१८ या वर्षामध्ये भरपूर प्रमाणात कांदाचाळ उभारणीचे लक्षांक कृषी विभागाला प्राप्त होणार आहे. यामुळे इच्छूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदाचाळ उभारणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज संबंधित कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. तद्नंतर तालुका हा घटक मानून जिल्हास्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थीला पूर्वसंमती देण्यात येईल. अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे. असे मिळणार अनुदान शासनाच्यावतीने देण्यात येणारे अनुदान ५ मेट्रीक टन पासून २५ मेट्रीक टन क्षमतेच्या कांदा चाळीस देय राहील. कांदाचाळी बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल ३ हजार ५०० प्रती मेट्रीक टन या प्रमाणे २५ मेट्रीक टन क्षमतेपर्यंत कांदाचाळीवर जास्तीत जास्त ८७ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जासोबत सातबारा, आठ अ, शेतकऱ्याचे छायाचित्र आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स जोडणे अनिवार्य असल्याचे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
५० टक्के अनुदानावर कांदाचाळ
By admin | Published: May 27, 2017 12:26 AM