वर्धेत अवयवदान अभियान : यशस्वीतेकरिता नागरिकांत आणखी जनजागृतीची गरज वर्धा : मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काही अवयव दुसऱ्याच्या कामी यावे याकरिता शासनाच्यावतीने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्र्यंत महाअवयवदान अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. या अभियानात नागरिकांत जनजागृतीसह अवयवदान करण्याबाबत अर्ज भरून घ्यावयाचे होते. वर्धेत जाजागृती करण्यात आली; यात यशस्वी होण्याकरिता आणखी जनजागृतीची गरज असल्याचे दिसून आले आहे. या तीन दिवसात वर्धेत केवळ ५३ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. शरीरातील अवयव निकामी झाल्याने अनेक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहेत. ज्यांना जीवन मिळण्याकरिता हे अभियान असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले. वर्धेत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत या अभियानाच्या जनजागृतीकरिता कार्यक्रम राबविण्यात आले. यात शहरातून रॅली काढण्यात आली. गुरुवारी पुन्हा दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जिल्ह्यात करण्यात आलेल्या जनजागृतीतून ५३ नागरिकांनी अवयव दानाचा अर्ज भरून दिला आहे. हा अर्ज भरताना त्याची माहिती परिवारातील सदस्यांना देणे अनिवार्य होते. तसे अर्ज भरल्यानंतर या दात्यांना डोनेट कार्ड देण्यात आले तर त्यांचा अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.(प्रतिनिधी) अभियानाच्या अंमलबजावणीकरिता विविध समित्याअभियानाच्या व्यापक व यशस्वी अंमलबजावणीकरिता जिल्ह्यात विविध स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले होत्या. यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्याची समिती गठीत करण्यात आली होती. शिवाय तालुका स्तरावरही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने केलेल्या जनजागृतीतून ५३ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. या तीन दिवस चालणाऱ्या अभियानानंतर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रमोद पवार यांनी हिरवी झेंडी दिली. या रॅलीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, डीचओ चव्हाण सहभागी होते.
अवयदानासाठी जिल्ह्यातून ५३ जणांचा पुढाकार
By admin | Published: September 02, 2016 2:04 AM