लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीनंतर जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर दिवसेंदिवस कोविड मृताकांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या स्थितीत सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात तब्बल ५७ कोविड बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ७४ हजार ८४७ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७४ हजार ८१२ व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून ७ हजार ८६१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी तब्बल ७ हजार १०० व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे. तर २४९ व्यक्तींचा कोविड-१९ विषाणूने बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्या ५१२ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यापैकी १४९ रुग्णांवर सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असले तरी या १४९ रुग्णांपैकी ५७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोविड आपले पाय पसरवित असल्याने नागरिकांनीही आता दक्ष राहण्याची गरज आहे.
२४ कोविड बाधित प्री-व्हेंटीलेटरवरमंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सेवाग्राम येथील रुग्णालयात प्री-व्हेंटीलेटरवर १६ तर सावंगी येथील रुग्णालयात आठ रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तींच्या प्रकृतीवर तेथील डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रकृती आणखी ढासळल्यास त्यांना वेळीच व्हेंटीलेटर लावले जाणार आहे.
दोन रुग्ण व्हेंटीलेटरवरसध्या स्थितीत सेवाग्राम येथील रुग्णालयात दोन कोविड बाधित व्हेंटीलेटरवर आहेत. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तेथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत.