जेवणानंतर प्रकृती बिघडली : १७ विद्यार्थी उपचारार्थ दाखल मारेगाव : येथील चिंधूजी पुरके आश्रमशाळेतील तब्बल ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४३ विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तर १७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सदर आश्रमशाळेत वर्ग १ ते १० चे ४०७ विद्यार्थी असून निवासी विद्यार्थ्यांची संख्या ३६६ आहे. गुरूवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी तासिकेसाठी वर्गात गेले असता काही वेळाने त्यातील अनेकांना मळमळ होऊ लागली. हा प्रकार लक्षात येताच सुमारे ६० विद्यार्थ्यांंना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यात आरती कुमरे, सुष्मिता घोसले, अंजली घोसले, मोहिनी घोसले, ज्योती आत्राम, पायल घोडनाके, सीमा मेश्राम, आरती घोसले, प्रकाश चांदेकर, रघुनाथ टेकाम, करिष्मा मेश्राम, वैैष्णवी पेंदोर, श्रद्धा मेश्राम, निलम टेकाम, अर्चना आत्राम, हेमराज मडावी, कृणाल कनाके यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सहावी ते १० व्या वर्गातील आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, पोलीस निरीक्षक संजय शिरभाते, नायब तहसीलदार दिगांबर गोहोकार, प्रकल्प अधिकारी भाऊ पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे आदिंनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.वानखेडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले असताना केवळ ६० विद्यार्थ्यांनाच विषबाधा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात असून या मागे काही घातपात तर नाही ना, याचा तपास मारेगावचे पोलीस करीत आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या अन्न व पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
६० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: January 13, 2017 1:29 AM