लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिके चांगल्या पद्धतीने घेता यावीत यासाठी पीककर्जाचे वाटप केले जाते. यावर्षी आठही तालुक्यांमध्ये नोव्हेंबरअखेर ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले. बँकांकडून वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या बँकांनी कर्जवाटपाकडे दुर्लक्ष केले त्यांना तत्काळ कर्ज वाटप करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाते. पीककर्ज सहज उपलब्ध व्हावेत म्हणून नजीकच्या बँकांना शेतकऱ्यांना जोडून देण्यात आले आहे. बँकांना पीककर्ज वाटपाचे शाखानिहाय उद्दिष्ट दिले जाते. कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून नियमित आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या खरीप व रब्बी पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपामध्ये बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून त्यापाठोपाठ इतरही बँकांनी पीककर्ज वाटप केले आहे, तर काही बँका दिलेल्या पीककर्जाच्या लक्ष्यापासून बऱ्याच दूर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकावर कारवाईची गरज आहे.
रब्बीसाठी ८२ कोटींच्या पीककर्जाची उचलजिल्ह्यात रब्बी हंगामही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी ८२ कोटींच्या पीककर्जाची उचल केली आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाने नियोजन केले असून त्यासाठी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ते उपलब्ध करून दिले पाहिजे, असे निर्देशही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.