चैतन्य जोशी
वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून जगात ओळख आहे. मात्र, याच जिल्ह्यात महिलांवरील होणारे अत्याचारही तेवढेच वाढते आहे. महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पोलिस दप्तरी नोंद झालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. यात मागील ११ महिन्यांत जवळपास ६०२ महिला व मुली विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अत्याचार, विनयभंगाच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिस विभागाकडून घटनेचे गांभीर्य पाहून आरोपींवर तत्काळ अटकेची कारवाईदेखील केली जाते. मात्र, सदैव अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या ‘बापूं’च्याच जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत तब्बल १०३ मुलींचे अपहरण झाले. यापैकी ९२ मुलींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले, तर तब्बल ६२४ महिला मिसिंग झाल्या असून, यापैकी ४५३ महिलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
यातील बहुतांश गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील महिला व मुलींवरील होणारे अत्याचार चिंताजनक असल्याचे ११ महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याला विकृत मानसिकतादेखील तेवढीच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
वर्षभरात पाच महिलांचा खून
जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत चार महिलांची विविध कारणांतून हत्या करण्यात आल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. पोलिसांनी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा छडा लावला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तळेगावच्या सत्याग्रही घाटात अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे आहे, तर महिलांच्या खुनाचे प्रयत्नही झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी ७ महिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. सर्व हल्लेखोरांना पोलिसांनी अटकही केली.
जिल्ह्यात बलात्काराची मालिकाच...
जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात बलात्कार-विनयभंगाच्या गुन्ह्यांची मालिकाच सुरू राहिली. मागील अकरा महिन्यांत ९२ महिलांवर, तर २७ अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी पडल्या. २०१ महिलांचा, तर ५६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला. बहुतांश गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. काही प्रकरणांची सुनावणीदेखील सुरू झाली आहे.
१३ जणी ठरल्या आत्महत्येच्या बळी
कौटुंबिक, सावकारी, आर्थिक चणचण, मानसिक आजार, नैराश्य यातून १३ महिलांनी स्वत:चा जीव गमावला आहे. हुंडाबळीच्या घटना अजूनही जिल्ह्यात घडत आहेत. चारित्र्याचा संशय, माहेरून पैसा आणावा यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या. याच कारणांचा त्रास सहन न झाल्याने ५८ महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केली.
‘त्या’ १८२ जणी गायबच!
जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान महिला मिसिंग, तर अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. १०३ मुलींचे अपहरण, तर ६२४ महिला मिसिंग झाल्या. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषणच्या पथकाने यापैकी ९२ मुलींना, तर ४५३ महिलांचा छडा लावून संबंधित महिला व मुलींना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, अजूनही ११ मुली आणि १७१ महिला गायब असून, मिळून आलेल्या नाहीत.
महिला अत्याचाराची आकडेवारीवर दृष्टिक्षेप
- हत्या - ०४
- महिला अत्याचार -९२
- अल्पवयीनांवर अत्याचार - ६४
- विनयभंग - २०१
- अल्पवयीनांचा विनयभंग - ५६
- हत्येचा प्रयत्न - ०७
- अश्लील इशारे - ०४
- आत्महत्येस प्रवृत्त करणे - १३
- हुंड्यासाठी छळ - ५८