राज्य परिवहन महामंडळ : बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचे अडीच महिने रूपेश खैरी वर्धाराज्य परिवहन महामंडळातून प्रवास करताना होणाऱ्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांना भरीव मदत देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू केली. प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटमागे एक रुपया अतिरिक्त घेण्याच्या या योजनेला अडीच महिन्याचा कालावधी झाला. या अडीच महिन्यात प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत वर्धा जिल्ह्याने तब्बल ६१ लाख २३ हजार ४३५ रुपयांची कमाई केली. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवास जवळचा असो वा लांबचा भुर्दंडाची रक्कम एक रुपयाच आहे. राज्यात ही योजना १ एप्रिल २०१६ पासून सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या पाच आगारातून ३५० बसगाड्या रस्त्याने धावत आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कुठलाही नियम नसलेली परिवहन महामंडळाची ही पठाणी वसुली सुरू आहे. योजना सुरू झाल्याच्या अडीच महिन्यात वर्धा जिल्ह्यात सरासरी विचार केल्यास महिन्याकाठी २१ लाख रुपयांची कमाई होत आहे. यात वर्षाचा विचार केल्यास या योजनेतून जिल्ह्याला सुमारे तीन कोटी रुपयांचा लाभ होणार असल्याचे चित्र आहे. गत आर्थिक सत्रात नफा कमविण्यात वर्धा विभागत नागपूर विभागातून अव्वल ठरला तर विदर्भातून दुसऱ्या क्रमांकावर होता. या कमाईमुळे यात आणखीच भर पडणार असल्याचे चित्र असले तरी प्रवाश्यांना सेवा देण्यात मात्र वर्धा विभाग माघारत असल्याचे वास्तव आहे. महामंडळाच्या बसमूधन प्रवास करताना घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्याला महामंडळाव्यावतीने ३ लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. ही मदत वाढविण्याकरिता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अपघात सहाय विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ३ ऐवजी १० लाख रुपये देण्याचे ठरले. याकरिता रक्कम उभारण्याकरिता परिवहन महामंडळाने ही शक्कल लढवित तिकीटाचे दर कायम ठेवत केवळ ‘सुपर चार्ज’ म्हणून प्रत्येक तिकिटावर एक रुपया अतिरिक्त घेणे सुरू केले. हम् एक रुपया, असे म्हणत प्रवाशांनीही योजनेला विरोध केला नाही. मात्र याच एक रुपयातून परिवहन महामंडळाची कमाई कोट्यवधीने वाढत आहे.
सुपर चार्जच्या एक रुपयातून ६१.२३ लाखांची कमाई
By admin | Published: June 30, 2016 2:21 AM