१,६१२ अर्ज दाखल : महिला तक्रार निवारण केंद्राचे कार्यगौरव देशमुख वर्धालग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते. मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते. वाद विकोपाला जाऊन विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संसाराला नवसंजिवनी देण्याचे काम पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रातून चालत आलेले आहे. या केंद्रातून वर्धा जिल्ह्यात या वर्षातील म्हणजे १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचा १२ महिन्यात विस्कटलेल्या ६३८ संसाराच्या गाठी पुन्हा जोडण्यात आल्या आहेत. या केंद्राने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या १२ महिन्यात तुटणाऱ्या संसाराची घडी बसवित त्यांना ‘नांदा सौख्य भरे’ हा कान मंत्र दिला. पती-पत्नी हे संसाराची दोन चाके असून यातील एक चाक जरी अविश्वास, संशयाच्या गळात रूतले तर संसाराचा गाडा मध्येच थांबतो थेट घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकारण पोहचते. अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. तेथील फेऱ्या मारण्यातच काळ सरतो. नवरा-बायको सोबतच त्यांच्या मुलांसह दोन्ही कडील कुटुंबाचीही वाताहत होते. शिवाय या दोन्ही कुटुंबामध्ये निर्माण झालेले वैर आयुष्यभर राहते. छोट्या-छोट्या कारणामधून निर्माण झालेले गैरसमज केवळ सुसंवादाच्या अभवाने वाढत जातात. रेशीम गाठीचे बंध गळून पडतात. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्राची संख्या ४ आहे. वर्धा जिल्ह्यातील तक्रार निवारण केंद्रामध्ये सेलू, हिंगणघाट, कारंजा हे तीन समुपदेशन केंद्र तसेच वर्धा येथे मुख्य केंद्र आहे.या तीन समुपदेशन केंद्रासह वर्धेच्या मुख्य महिला तक्रार निवारण केंद्रातील एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या १२ महिन्यामध्ये दाखल झालेल्या ७८९ तक्रारी पैकी २४२ संसाराची घडी बसविण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्धा जिल्ह्यातील ४ केंद्रातून १ हजार ६१२ तक्रारी पैकी ६३८ संसाराच्या घडी बसविण्यात या विभागाला यश आले आहे.वर्धा पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रभा एकुरके, अनू राऊत (एएसआय), सुरेखा खापर्डे (एलएचसी), सविता मुडे (एलएचसी), अंजू वाघ (एनपीसी), विना क्षीरसागर व इतर महिला कर्मचारी तक्रारदारांचे समुपदेशन करून संसार तुटल्यावर होणारे परिणाम, त्यांची गंभीरता रागाच्या भरात घेण्यात येणारे निर्णय या बाबत मार्गदर्शन करीत आहेत. या १२ महिन्यात वर्धा जिल्ह्यात एकूण १ हजार ६१२ अर्ज दाखल झाले आहेत. यातील ६३८ अर्ज समुपदेशाने निकाली काढण्यात आली असून यांनी नव्याने संसार पुन्हा सुरू केला आहे. १ हजार ३९९ प्रकरणाचा निपटारा झाला आहे.यातील २१३ प्रकरणे प्रलंबित आहेत. ५७८ प्रकरणात तक्रारी फाईल झाल्या आहेत, आठ प्रकरण पोलीस ठाण्यात परत पाठविण्यात आली आहेत. २४ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात १ प्रकरण बलात्काराचे आहे. महिलावर होणाऱ्या स्वास्थ्य अधिकार कौटुंबिक हिंसाचार २००५ नुसार न्यायालयात एकूण १२१ प्रकरणे दाखल असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे.अधिकाधिक तक्रारी व्यसनाधीनतेच्या तक्रार निवारण केंद्राकडे येणाऱ्या बहुतेक तक्रारी या व्यसनाधीन पतीच्या असतात. दारूड्या नवऱ्याकडून होणाऱ्या छळ, मुलाबाळाची होणारी परवड या कारणामुळे पतीशी वाद, छळाला कंटाळून जाणाऱ्या अनेक महिला तक्रार निवारण केंद्राकडे येतात.या शिवाय संशयाची वृत्ती, पुरूषी अहंकार, विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठाचा नसलेला आधार, छोट्या-छोट्या कारणावरून गैरसमज आणि सुसंवादाचा अभाव यामुळे संसार तुटत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित, उच्च शिक्षित कुटुंबातूनही या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या विभागातील स्थानिक समितीही यांना समुपदेश करण्यासाठी काम करीत असते. तसेच स्थानिक समितीमध्ये जिल्ह्यातील महिलांचा समावेश असून प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येते.
६३८ संसाराच्या पुन्हा जुळल्या रेशीम गाठी
By admin | Published: April 18, 2017 1:19 AM