वर्धा : लोकसभेसाठी वर्धा मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यात ६४.८५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. शनिवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाची अंतिम टक्केवारी घोषित केली.
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धेसह देवळी, आर्वी, हिंगणघाट आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे शनिवारी मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली. मतदारसंघात १६ लाख ८२ हजार ७७१ मतदार आहेत. त्यापैकी १० लाख ९१ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
८ लाख ५८ हजार ४३९ पुरुषांपैकी ५ लाख ८६ हजार ७८० पुरुषांनी, तर ८ लाख २४ हजार ३१८ महिलांपैकी ५ लाख ४ हजार ५६० महिलांनी मतदान केले. याशिवाय १४ इतर मतदारांपैकी नऊ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६१.५३ टक्के मतदान झाले होत. यावेळी मतदानाचा टक्का ३.३२ ने वाढल्याचे दिसून येत आहे.