लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा एक भाग म्हणून मंगळवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर आज शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण २३ हजार ६८ मतदार असून मंगळवारी प्रत्यक्षात ६५.३२ टक्के मतदारांनी सायंकाळी उशीरापर्यंत मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. वर्धा जिल्ह्यातील तीन उमेदवारांसह एकूण १९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात २३ हजार ६८ मतदार असून यात १४ हजार ४५ पुरुष तर ९ हजार ३० महिला आणि तीन इतर मतदार आहेत. सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३५ मतदान केंद्रांवर ९.१ टक्के मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. तर दुपारी १२ वाजेपर्यंत ३ हजार ६७७ पुरुष तर १ हजार ३०६ महिलांनी मतदान केले होते. जसजसा सूर्य मावळतीला गेला तस तसा जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला. दुपारी २ वाजेपर्यंत ६ हजार १२७ पुरुष तर २ हजार ७३२ महिला पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी ४ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील १४ हजार ४५ पुरुष मतदारांपैकी ८ हजार ५४९ तर ९ हजार २० महिला मतदारांपैकी ४ हजार ३७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे सिंदी रेल्वे येथील मतदान केंद्रावर मंगळवारी दुपारी एका कोविड बाधित पदवीधर मतदाराने प्रत्यक्ष मतदान केले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराच्या शरिराचे तापमान थर्मलस्कॅनिंग गनच्या सहाय्याने तपासण्यात आले. तर ऑक्सिमिटरच्या सहाय्याने मतदारांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली. एकूणच कोरोना संकट लक्षात घेवून खबरदारीच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण १५ हजार ६८ मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
महिलांचा अल्प प्रतिसाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ हजार २० महिला मतदारांनी नोंदणी केली आहे. तशी नोंदही निवडणूक विभागाने घेतली आहे. पण मंगळवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाला अल्प प्रतिसाद दिल्याचे दुपारी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदा ५६.३ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. आंजी (मोठी) : येथील मतदान केंद्रावर तब्बल १४५ व्यक्तींचे मतदान असून मंगळवारी प्रत्यक्षात केवळ ९५ मतदारांनी मतदान केले.
तीन तालुक्यात झाले ६९ टक्के मतदानजिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात दुपारी ५ वाजेपर्यंत ६९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आर्वी तालुक्यातील ९३९ पुरुष तर ४५२ महिला, आष्टी तालुक्यातील ४१६ पुरुष तर १७८ महिला तसेच कारंजा तालुक्यातील ५३८ पुरुष तर २१४ महिला मतदारांनी मतदान केले.
पोलिसांचा पहाराजिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवरून आज प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. या केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली केंद्राची प्रत्यक्ष पाहणीवर्धा शहरातील मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन मतदार करीत आहेत काय याची पाहणी स्वत: जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास न्यू इंग्लिश ज्यूनिअर हायस्कूल या मतदान केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी नायब तहसीलदार वनकर यांची उपस्थिती होती.
एक मिटरचे पाळले अंतरकोरोनायनात प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली असली तरी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करता यावे म्हणून मतदान केंद्राच्या आवारात रंगाच्या सहाय्याने विशिष्ट रकाने तयार करण्यात आले होते. शिवाय पोलीस आणि मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या.