रणसंग्रामाला सुरुवात : २९ अपक्षांसह सर्वच राजकीय पक्ष मैदानातवर्धा : नामांकन परत घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी १६ जणांनी आपली उमेदवारी परत घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात ६९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. आर्वी मतदार संघात १५, देवळीत १९, हिंगणघाटात १४ आणि वर्धा मतदार संघात २१ उमेदवार आहेत. यामध्ये चारही मतदार संघात २९ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन परत घेण्याच्या आदल्यादिवशी देवळीतून मनसेचा उमेदवार बाद झाला, तर आर्वीतून माघार घेतल्यामुळे या दोन्ही मतदार संघातून मनसेचे आव्हान संपुष्टात आले आहे. चारही मतदार संघात प्रचार तोफा आता मैदानात सज्ज झाल्या आहे.आर्वी, हिंगणघाट, देवळी आणि वर्धा या चारही मतदार संघात किती उमेदवार रिंगणात राहतील, याची उत्सुकता संपली. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून देवळी व आर्वीत मनसे वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार रिंंगणात आहे. वर्धेतील सर्वाधिक १४ राजकीय पक्षांचे उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. सात अपक्षही रिंगणात आहे. अपक्षांना चिन्हांचेही वाटप करण्यात आले. भाजपाचे दोन बंडखोर रिंगणात असून एकाने माघार घेतली आहे. काँग्रेसच्या दोघांनी आपले नामांकन परत घेतल्यामुळे बंडाळीचा धोका टळला आहे. गुरुवारपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात होईल. जिल्ह्यात सर्वाधिक २१ उमेदवार वर्धा विधानसभा क्षेत्रात आहेत. अर्ज परत घेण्याच्या अंतिम तारखेला सहा जणांनी आपले अर्ज परत घेतले आहे. हिंगणघाट मतदार संघात पाच अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदार संघातून एकानेही माघार घेतली नाही. सात जणांनी आपले नामांकन परत घेतल्याने देवळी विधानसभा क्षेत्रात नऊ अपक्षांसह १९ उमेदवार रिंगणात आहेत. आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रातून तिघांनी माघार घेतली. आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मनसेने मतदार संघातून माघार घेतली आहे.(प्रतिनिधी)
६९ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 01, 2014 11:26 PM