राजेश सोळंकी
आर्वी (वर्धा) : धडधाकट युवकाला एका अपघातात अपंगत्व आले. मणक्याचे तुकडे झाल्याने कंबर, पाठ व पायाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनीच तुटली. त्यामुळे चालणे तर सोडाच, पण बसताही येईना. त्यामुळे त्याला नैराश्य आले. तरी मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. या जिद्दीनेच अभ्यासाचे नियोजन करून आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने तब्बल १३७ पानांचे पुस्तक इंग्रजीतून लिहून काढले. ते पुस्तक १७ देशांतील ७० लाख युवकांनी वाचले असून, त्याची दखलही घेण्यात आली.
संतोष बबन वाघमारे असे या युवकाचे नाव आहे. तो वाशिम जिल्ह्यातील पासोडा या गावचा मूळ रहिवासी आहे. ११ वर्षांपूर्वी आर्वीला स्थायिक झाल्यानंतर मंगलमूर्ती कॉटेक्स कंपनीत जिनिंग ऑपरेटर म्हणून संतोषने कामाला सुरुवात केली. त्याचे परिश्रम बघून कंपनी मालक अंकित अग्रवाल यांनी त्याला राहायला घर दिले. त्यानंतर भाऊ गणेश व स्वप्नील आणि आई-वडीलही येथेच राहायला आले; परंतु चार वर्षांपूर्वी जिनिंगमध्ये काम करीत असताना संतोष खाली कोसळला.
या अपघातात त्याच्या मणक्याचे तुकडे झाल्याने १५ ते २० दिवस तो अतिदक्षता विभागात होता. त्यानंतर ९ महिने डॉ. सविता बोंद्रे यांनी त्याच्यावर अत्यल्प दरात फिजिओथेरपी केली. औषधोपचाराकरिता १६ ते १८ लाख रुपये खर्च आला. त्याकरिताही अंकित अग्रवाल यांनी मदत केली. मात्र, संताेषला कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने तो विवंचनेत होता. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने इंग्रजी वाचनास सुरुवात केली. स्वतः इंटरनेटच्या माध्यमातून साहित्य गोळा करून नोंदी घेतल्या. ई-बुक रायटिंग केले आणि ‘सोशल मीडिया मार्केटिंग ऑन माय स्टार्टअप’ या नावाचे १३७ पानांचे पुस्तक तयार केले.
ते पुस्तक ॲमेझॉन किंडरच्या माध्यमातून इंडियन ग्लोबल आयकॉन मॅक्झिनला ऑनलाइन पाठविले. ते पुस्तक भारतासह युरोप, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, जपान, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, यूएस, यूके आदी १७ देशांतील ७० लाखांपेक्षा अधिक युवक-युवतींनी वाचले. याची दखल घेत संतोषला ‘इंडियन प्राईम आयकॉन अवॉर्ड’ देण्यात आला.
दिव्यांगांनो, खचून न जाता जिद्द ठेवा
जिनिंगमध्ये अपघात झाला आणि माझं ध्येयच हिरावलं. मात्र, माझ्या आई-बाबांनी आणि मालकांनी मला आधार दिला. त्यावरून ई-बुक रायटिंग लॉगिन क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. एक वर्ष अभ्यास करून ‘सोशल मीडिया मार्केटिंग ऑन माय स्टार्टअप’ हे ऑनलाइन बुक लिहिले. १७ देशांतील ७० लाखांच्या वर तरुणाईने याचे वाचन केले. आता इंडियन शेअर मार्केट फॉरेन्सरेंज करन्सी मार्केट यावर अभ्यास सुरू आहे. पैसा कमविणे हा उद्देश नाही तर दिव्यांगांना दिशा देणे हे माझे कार्य आहे.