ग्राहकही त्रस्त : दागिन्यांविनाच विवाह सोहळेवर्धा : केंद्र शासनाने सुवर्ण खरेदीवर एक टक्का अबकारी कर लादला. याविरूद्ध सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला. २ मार्चपासून संपूर्ण सराफा दुकाने बंद असल्याने जिल्ह्यात सोने खरेदी-विक्रीतून होणारी सुमारे ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. ग्राहकांचेही मोठे नुकसान होत असून विवाह सोहळ्यांत आडकाठी येत आहे.जिल्ह्यात २ मार्चपासून सराफा असोसिएशनने बंद पुकारला. प्रारंभी तीन दिवसांचा असलेला हा बंद केंद्र व राज्य शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने बेमुदत करण्यात आला. ३० दिवसांपासून सराफा बाजार बंद असल्याने ग्राहकांची मोठीच गोची झाली. सुवर्णकारांचा ७० कोटींचा व्यवसाय तर ठप्प झालाच; पण विवाह सोहळ्यांवरही विपरित परिणाम झाला आहे. सोन्याचे दागिणे बनविता येत नसल्याने अनेक विवाह सोहळे रद्दच झाले. काही लग्न पूढे ढकलले गेले तर बहुतांश ठरलेले विवाह सोन्याच्या दागिण्यांविना उरकले जात असल्याचे दिसते. काही विवाह सोहळ्यांत सोन्याच्या रूपात ठरलेली देवाण-घेवाण पैशाच्या रूपाने होत असल्याचे दिसून आले. सराफा असोसिएशनने केंद्र शासनाने लादलेला अबकारी कर रद्द करावा, ही मागणी लावून धरली आहे. यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. भाजी, फळांच्या विक्रीसह गत तीन दिवसांत रस्ता रोको, खासदारांच्या घराला घेराव करीत निवेदने देण्यात आली. ४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाणार असल्याचे सराफा असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे. आता तर एक्साईज विभागच नको, अशी भूमिका सराफा असोसिएशनच्यावतीने घेण्यात आली आहे. यात काय निर्णय होतो, याकडे सुवर्णकारांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
३० दिवसांत जिल्ह्यात ७० कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: March 31, 2016 2:41 AM