१.२० कोटी वसूल : दररोज दीड लाखांच्या वसुलीचे उद्दिष्टआर्वी : आर्थिक वर्ष समाप्तीचा मार्च महिना धावपळीचा म्हणून ओळखला जातो. हा महिना आर्थिक देवाण घेवाण व शासकीय कार्यालयातील आर्थिक गोळाबेरीजेचा महिना म्हणून नेहमीच चर्चेत असतो. आर्वी पालिकेची मालमत्ता कराची वसुली करण्याची धडक मोहीम सध्या आर्वी पालिका कार्यालयाच्यावतीने शहरात सुरू आहे. याकरिता आठ कर्मचाऱ्यांचे फिरते पथक असताना ७० लाख रुपयांची वसुली शिल्लक आहे. पालिकेचे मालमत्ता करापोटी १ कोटी ९० लाख रुपयांचे बजेट आहे. यापैकी ३० मार्चपर्र्यंत १ कोटी २० लाखांची वसुली झाली आहे. शहरात एकूण २३ वॉर्ड असून येथे १२ हजार ११ घरांची संख्या आहे. यात सर्वाधिक मालमत्ता कराच्यापोटी शासकीय कार्यालये, निमशासकीय विविध कंपन्याचे मोबाईल टॉवर तसेच इतरही उद्योग व्यावसायिकांकडून वार्षिक मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते.पालिकेच्यावतीने या आर्थिक महिन्यात ५ मार्चपासून आठ कर्मचाऱ्यांचे जप्ती पथक आर्वी शहरात विविध थकीत करदात्यांकडून आर्थिक कर वसूल करीत आहे. यात हे पथक दररोज ७० हजार ते दीड लाखापर्यंतची वसुली करीत आहे. यात पालिकेने २०१५-१६ या वर्षात आर्थिक कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर ठेवली होती. त्यानंतर त्या थकीत मालमत्ता करावर दोन टक्के अतिरिक्त व्याज आकारण्यात येत आहे. शहरात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये असून या कार्यालयाकडे आर्थिक कर दरवर्षी थकीत राहतो. यात आर्वी उपजिल्हा रुग्णालयात ५ लाख रुपये, जि.प. कन्या शाळा ३ लाख रुपये, बीएसएनएल कार्यालय ३ लाख रुपये व आर्वीतील मोबाईल कंपन्यांच्या एकूण सात टॉवर पैकी दोन टॉवरवर प्रत्येकी ७० ते ८० हजारांचा कराचा भरणा थकीत आहे. यासाठी पालिकेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व कर अधीक्षक खंडेलवाल, सहाय्यक कर निरीक्षक राजू फेतफूलवार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कर वसुली मोहीम जोरात सुरू असून थकबाकी पुर्णत: वसूल करण्याचा मानस आहे.(तालुका प्रतिनिधी)
मालमत्ता कराचे ७० लाख रुपये थकीत
By admin | Published: April 01, 2016 2:26 AM