लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : तालुक्यातील अखेरच्या टोकावरील व जंगलव्याप्त भाग असलेल्या गरमसूर येथे ७८ व्यक्तींनी शनिवारी कोविडची लस घेतली. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर पण डोंगराळ भागात ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायती सहकार्याने आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले. मात्र, लसीकरण करताना नोंदणी करणे अनिवार्य असते आणि ही नोंदणी करताना सर्वांत मोठी अडचण निर्माण झाल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला मोबाइल कव्हरेज पाहण्यासाठी दीड कि.मी. अंतराचा परिसरात फिरावे लागले. अखेर गावापासून दीड कि.मी. अंतरावर मोबाइल कव्हरेज मिळाल्याने गावातून नागरिकांना त्या स्थळावर नेऊन नोंदणी करणे व पुन्हा तेथून लसीकरणाकरिता गावात आणावे लागले. यासाठी ग्रा.पं.ला वेळेवर वाहन व्यवस्था करावी लागली. या अगोदर गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना लस घेण्यासाठी तयार करण्यात आले. हे गाव सालई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. या गावाचा संपर्क वर्धा जिल्ह्याशी कमी आणि नागपूर जिल्ह्याशी अधिक येतो. मात्र, डोंगराळ भागातही लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये हा उद्देश ठेवून मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. त्यात ४५ ते ५९ या वयोगटातील ३५ व ६० प्लस मधील ४२, १ फ्रंटलाईन वर्कर यांचा लस घेणाऱ्यात समावेश आहे. मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाडीभस्मे, सरपंच अर्चना सलाम, ग्रामसेवक सुहास लंगडे, माजी उपसभापती उल्हास रणनवरे, तलाठी चन्नुरवार, आरोग्य सेवक रंगारी, प्राथमिक शाळेतील शिक्षक बारस्कर, पराते, पोलीस पाटील खंडाते आदी सहकार्य करीत आहेत.
दिव्यांग, वयोवृद्धांचे घरी जाऊन लसीकरण- दिव्यांग व वयोवृद्धा नागरिकांना त्यांचे घरी जाऊन त्यांना कोरोनाची लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग याबाबतीत सतर्क आहे.
मोबाइल कव्हरेजसाठी भटकंती- टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या गावात मोबाइल कव्हरेजचा सुकाळ आहे. पण गावात चमू पोहोचली अन् मोबाइल कव्हरेज नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा या कव्हरेजसाठी दीड किलोमीटर अंतराची भटकंती करण्याची वेळ आली. अखेर कव्हरेज मिळाले आणि नोंदणीचा करण्याचा मार्ग सुकर झाला.