विधानसभा निवडणूक : प्रतिबंधात्मक कारवाईत १७ पोलीस ठाण्यांतर्गत होणार ६० जणांना अटक रूपेश खैरी - वर्धाविधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने ‘हिस्ट्रीशिटर’ व शांतता भंग करण्याचे कारण ठरणाऱ्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्याचा नियम आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात तिघांवर जिल्हाबंदीची कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत एकूण ९२ प्रकरणे सादर केली असून त्यांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही. या संदर्भात शनिवारी सायंकाळी बैठक होणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात असलेल्या १७ पोलीस ठाण्यांतर्गत एक हजार ३०६ मतदान केंद्रावरून मतदान करण्यात येणार आहे. एवढ्या मतदान केंद्रांतर्गत काही मतदान केंद्र संवेदनशिल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या भागात पोलिसांची अधिक गस्त राहणार आहे. जिल्ह्यात ही शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने विविध कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. ९२ जणांना जिल्हाबंदी करण्याचा प्रस्ताव आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. यावर निर्णय होण्याची अपेक्षा असताना मतदानाची तारीख आली तरी त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत जर यावर निर्णय झाला नाही तर पोलिसांना उद्भवणारी परिस्थिती सांभाळण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. अशात प्रस्ताव मान्यतेचे कागद तयार झाले असले तरी त्यावर अद्याप स्वाक्षरी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही कुख्यात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. यात भादंविच्या कलम १०७, ११० व १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत कारवाई करण्याकरिता जिल्ह्यात ६२३ जणांची यादी करण्यात आली होती. असे असले तरी वास्तविकतेत यापेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ६० जणांना अटक करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अटक करण्याची कारवाई रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. या कामाकरिता पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाला जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात दारूबंदीच्या २४२ कारवाई निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रामणात दारू येत असल्याचे समोर आले. या काळात येणारी दारू पकडण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथाकच्या कारवाईनुसार आचारसंहिता जाहीर झाली त्या काळापासून दारूबंदीच्या कायद्यांतर्गत २४२ कारवाया करण्यात आल्या. दारूबंदीच्या कारवाई अद्यापही सुरूच आहे. यादीपेक्षा आरोपी अधिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता प्रतिबंधात्मक कारवाईकरिता भादंविच्या कलम १०७ अन्वये २९१ जणांवर कारवाई करण्यात येणार होती. प्रत्यक्षात मात्र ६२६ जणांवर कारवाई झाली. कलम ११० नुसार २०६ जणांवर कारवाई करावयाची होती; मात्र यात २११ जणांवर कारवाई करण्यात आली. तर कलम १४४ अन्वये ६६ जणांवर कारवाई करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र ८२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तडीपारीची ९२ प्रकरणे प्रलंबित
By admin | Published: October 11, 2014 11:11 PM