वर्धा : समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाम येथील टेक्सटाइल्स कंपनीतून तब्बल १५.१४ लाखांचा तांबा ताराचे रोल चोरून नेणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर, फरार असलेल्या तब्बल सहा आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.
जाम येथील पी.व्ही. टेस्क टाइल्स कंपनीतून चोरट्यांनी १५ लाख १४ हजार ७३४ रुपये किमतीचे तांब्याच्या ताराचे रोल चोरून नेल्याची तक्रार सुरक्षाप्रमुख अमोल रामचंद्र पवार यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूकडून करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर येथील चोरट्यांच्या टोळीतील नऊ व्यक्तींना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्रतीक ऊर्फ लाला सुरेश शिंदे (२५), गुड्डू श्रीपाल निषाद (२१), पवन देवी निशाद (२९), विकास सुभाष ढोके (२१), भारत देवी निशाद (२१), छोटेलाल श्रीपाल निशाद (२५), राकेश सुदेश शर्मा (३६), अशोक पोचा परचाके (१९) व मो. इजाज अब्दुल रहमान (५५), सर्व रा. चंद्रपूर असे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर नौशाद कुरेशी, कौसर, कमलेश यादव, सलमान चौघे रा. घुग्गुस आणि बबलू निशाद व अनिल निशाद दोन्ही रा. चंद्रपूर अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत. फरार आरोपींनाही लवकर अटक करू, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर पोलिसांचे सहकार्य राहिले मोलाचे
सदर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर चंद्रपूर पोलीस विभागातील फौंजदार संदीप कापडे, संदीप मुळे, नागोसे, चौहान यांनी वर्धा पोलिसांना मदत केली. एकूणच चंद्रपूर पोलिसांचे सहकार्य या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात मोलाचेच राहिले.
१४.५६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
सदर चोरट्यांकडून पोलिसांनी १४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १ लाख ६७ हजार २०० रुपयांचा २०९ किलो तांब्याचा तार, ९ हजार ७६० रुपये किमतीचा जीआय तार व प्लास्टिक केबल, ३० हजार रुपये किमतीचे सहा मोबाइल तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या चार वाहनांचा समावेश आहे.