सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड महिना एसटीची चाके जागीच थांबली होती. परिणामी, वाहतूक उत्पन्नाला ९० लाख रुपयांचा फटका बसला. आता अनलॉकनंतर एसटीची चाके पूर्वपदावर आली असून, प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे वर्धा विभागाचे लक्ष लागले आहे.मागील वर्षभरापासून देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच, यंदाही हे संकट घोंगावत होतेच. मागील वर्षी तब्बल चार महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. दरम्यान, महामंडळाला कोटी रुपयांचा फटका बसला. ऑक्टोबरअखेर एसटीची चाके फिरलीत. एसटी पूर्णक्षमतेने धावू लागली. उत्पन्नही बऱ्यापैकी मिळत असताना, याही वर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला. ब्रेक द चेनअंतर्गत एसटी केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच धावत होती. यातून महामंडळाला दररोज केवळ एक ते दोन हजार इतकेच वाहतूक उत्पन्न मिळत होते. थोडे-फार का होईना, उत्पन्न मिळत असतानाच, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्युसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध घालण्यात आले आणि पुन्हा एसटीची वाहतूक बंद झाली. मध्यंतरीच्या काळात तब्बल ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. एसटीची दररोजचे सरासरी वाहतूक उत्पन्न २० लाख रुपये आहे. या उत्पन्नाला मुकावे लागल्याने दीड महिन्यात महामंडळाला ९० लाखांचा फटका बसला. वर्धा विभागांतर्गत वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार असून, एकूण २२८ बसगाड्या आहेत. अनलॉकनंतर एसटी आता पूर्णक्षमतेने धावत आहे. दररोज ११० ते १२० गाड्या धावत असून, ३०० ते ३५० फेऱ्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होत आहेत. प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसला, तरी सद्यस्थितीत दररोज १० लाख रुपयांचे वाहतूक उत्पन्न वर्धा विभागाला मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने, मागील वर्षीपासून महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू केली. या मालवाहतुकीतून एसटीला महिन्याकाठी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
वाहतूक उत्पन्न आले निम्म्यावरएसटीचे दररोजचे सरासरी वाहतूक उत्पन्न २० लाख रुपये आहे. मागील वर्षीपासून कोरोनाने थैमान घातल्याने, एसटीची प्रवासी वाहतूक तब्बल चार ते पाच महिने बंद होती. दरम्यानच्या काळात एसटीला कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. याही वेळी तब्बल दीड महिना एसटी लॉकडाऊनमुळे बंद होती. या काळात एसटीचे ९० लाखांचे नुकसान झाले. आता एसटीची चाके पूर्वपदावर आली आहे. मात्र, प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नसल्याने, वाहतूक उत्पन्न २० लाख रुपयांवर आले आहे.
मालवाहतुकीतून एसटीला महिन्याकाठी १५ लाखांचे उत्पन्नमागील वर्षीपासून देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या कालावधीत एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली. या मालवाहतुकीतून एसटीला काही प्रमाणात का होईना, उत्पन्न मिळत आहे. वर्धा विभागात २५ मालवाहतूक ट्रक असून, महिन्याकाठी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.