लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्या मार्गदर्शनात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. २० सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ९९ गावांतील ९२ हजार लोकांची कुष्ठरोग विषयक पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी १०२ आशा स्वयंसेविका आणि ७५ पुरूष स्वयंसेवक घरोघरी जाऊन नोंदणी करून घेणार आहेत.शोध मोहिमेत आढळून आलेल्या सर्व कुष्ठ रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटेकर, डॉ. एम.के. चरपे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रभाकर वंजारी आणि वैद्यकीय कर्मचारी करणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी अलर्ट इंडिया लेप्रसी वर्धाचे डॉ. दिनेश हिवसे यांच्या हस्ते तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्या अध्यक्षतेत डॉ. वंजारी यांच्या आतिथ्यात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रवीण खडसे यांनी कुष्ठरोगी शोधणे, जनजागृती करणे, एम.डी.टी. औषधोपचार करून रुग्ण रोगमुक्त करणे हा या शोध अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. कुष्ठरोगाबाबत सामाजिक गैरसमजुती, अज्ञान यावर डॉ. दिनेश हिवसे यांनी मार्गदर्शन केले. कारंजा येथे कार्यरत असलेल्या कुष्ठरोग केंद्रावर रुग्णांनी भेटी देऊन भौतिकोपचार, होप थेअरपी, स्टीम्यूलेशन आदी उपचार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.अंगावर पांढूरके डाग, लालसर बधीर चट्टा, चेहरा वाजवीपेक्षा लाल होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, हाता-पायाच्या बोटांची संवेदना कमी होणे ही कुष्ठरोगांची प्रमुख लक्षणे आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनामध्ये नियमित औषधोपचार घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा करता येतो, असेही सांगण्यात आले. तालुकास्तरावर कुष्ठरोग समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी सातघरे तर सदस्यांमध्ये गटशिक्षण अधिकारी बोळणे, पं.स. सदस्य टिकाराम घागरे, गोपाल विरूळकर आणि अंगणवाडी प्रकल्प अधिकारी आशा महाडिक आदींचा समावेश करण्यात आला आहे.कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करण्याकरिता कुष्ठरोग तंत्रज्ञ श्याम राठोड, आरोग्य सहायक विनायक गिºहे, नितीन देशमुख आणि चौधरी सहकार्य करीत आहेत. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार कुष्ठरोग तंत्रज्ञ चौधरी यांनी मानले.
९२ हजार लोकांची होणार कुष्ठरोग विषयक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 11:15 PM
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्या मार्गदर्शनात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. २० सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ९९ गावांतील ९२ हजार लोकांची कुष्ठरोग विषयक पाहणी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे१०२ आशा सेविका कार्यरत : ९९ गावांमध्ये कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ