लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील लस साठा संपल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला होता. तर १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या वाट्याची लस ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. या परवानगीनंतर मागील ९६ तासांत तब्बल ५ हजार ६५५ लाभार्थ्यांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.लस तुटवड्यामुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा दुसरा डोस लाभार्थ्यांना कसा द्यावा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर होता. अशातच १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या वाट्याची लस दुसरा डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळाली.त्यानंतर सुरुवातीला कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला; तर नंतर कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील ९६ तासांत जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ६५५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. यात ४२ हेल्थकेअर वर्कर्स, ३५० फ्रन्टलाईन वर्कर्स, ४५ ते ६० वयोगटातील २ हजार ९७२, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील २ हजार २९१ लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील साडेचार लाख लाभार्थ्यांना कोविड लसीची प्रतीक्षा- २०११ च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ असल्याची नोंद घेण्यात आली आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस देणे बंद आहे; तर १४ मे पर्यंत १ लाख ९९ हजार ९८० व्यक्तींना लसीचा पहिला तसेच ४८ हजार ४९२ व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. परंतु, १८ पेक्षा जास्त वयोगटातील सुमारे साडेचार लाख लाभार्थ्यांना अजूनही लसीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.