आर्वी (वर्धा) : येथील विठ्ठल वार्ड येथे बुधवारी पहाटे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही बॉम्ब सदृश्य वस्तू बाहेरील गेटला कुलूप, साखळी पिशवी बॅटरी व टायमर अशा अवस्थेत लावलेले होते. यात दोन चिठ्ठ्या होत्या एक बाहेर आणि दुसरी पिशवीच्यां आत होती.या बाहेरील चिठ्ठीत याला हात लावू नका, अन्यथा मोठा स्फोट होईल, असे धमकीवजा पत्र होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
वंदना ज्ञानेश्वर कारमोरे वय 57 वर्ष रा. विठ्ठल वार्ड यांच्या घराच्या बाहेरील लोखंडी गेटला साखळी, कुलूप आणि त्यात पिशवीत टायमर बॉम्ब सदृश्य वस्तू सकाळी साफसफाई करण्यासाठी उठलेली नात अनुप चोपकर वय 18 हिला दिसून आली. तिने आजी वंदना हिला त्वरित माहिती दिली. वंदना यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सकाळी गस्तीवर असणारे मिलिंद पाईकराव यांनाही गर्दी दिसताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.सी खंडेराव यांना फोन करून माहिती दिली. लगेच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक रवाना झाले.
त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी पांगवली. बॉम्बस्फोट पथक वर्धा यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती डी वाय एस पी यांनी दिली. तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव यांनी यांनी स्वतः बॉम सदृश्य वस्तूचे वायर कापले व टायमिंग बंद केला.
प्रेम प्रकरणातून ही बाब घडल्याचे पिशवीतून असलेल्या चिठ्ठीत पुढे आले आहे. याचा सखोल तपास सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी देवराव खंडेराव यांनी सांगितले. यासंदर्भात एपीआय पाटणकर, पीएसआय सर्वेश बेलसरे आणि डीबी पथक यांना संबंधित युवकाच्या तपासणीसाठी ताब्यात घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच चौकशीकरिता सकाळी ९:०० वाजता संबंधित कुटुंबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलविले आहे.घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांनी दिली.