वर्धा : वाघाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याने शनिवारी तेरवीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरु असतानाच मुलगा मोबाईल चार्जींगवर लावण्यासाठी गेला असता वीजेचा जोरदार झटका लागल्याने मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आष्टी तालुक्यातील येनाडा गावात शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्देवी घटनेने समजमन सुन्न पडले.
निकेश सुभराव भास्कवरे (१५) असे मृतक मुलाचे नाव आहे. निकेश हा आष्टी येथील अंजनाबाई झोडे विद्यालयात नवव्या वर्गात शिकत होता. त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने तेरवीचा कार्यक्रम होता. तो मोबाईल चार्जींगवर लावण्यासाठी गेला असता इलेक्ट्रिक बोर्डातील सॉकेटचा करंट लागला. नागरिकांनी त्याला मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकेशच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन केले.
निकेशच्या वडिलांचा वाघाच्या हल्ल्यात जखमी होवून ९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या तेरवीच्या गोड जेवणाच्या दिवशीच निकेशचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली होती. शोकाकुल वातावरणात निकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. निकेशच्या अकस्मात निधनाने समाजमन सुन्न पडले.