वर्धा : भरधाव जाणाऱ्या कारने बैलबंडीला समाेरुन जबर धडक दिली. या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर बैलबंडीचालकाच्या दोन्ही हाताला जबर मार लागला. हा अपघात २९ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट ते वडनेर रस्त्यावर झाला. याप्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अपघातस्थळावरुन कारचालकाने पळ काढला. गौतम वैद्य रा. घाटसावली असे जखमी बैलबंडी चालकाचे नाव आहे.
गौतम वैद्य यांची हिंगणघाट ते वडनेर रस्त्यावर शेती आहे. ते शेतात बैलबंडी घेऊन जात असताना समाेरुन भरधाव आलेल्या यूए. ०७ टी. ३३७६ क्रमांकाच्या कारचालकाने निष्काळजीपणे व हयगयीने कार चालवून बैलबंडीला जबर धडक दिली. या धडकेत बैलबंडी रस्त्याकडेला जाऊन उलटली. धडक इतकी भीषण होती की, एका बैलाजा जागीच मृत्यू झाला. तर गौतम वैद्य यांच्या दोन्ही हाताला गंभीर मार लागला.
अपघातात बैलबंडीचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच बैल दगावल्याने ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गौतम वैद्य यांचा मुलगा दिनेश याने वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली असून चालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती आहे. लवकरच आरोपी कार चालकास अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मिश्रा यांनी सांगितले. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.