वर्धा : बनावट व खोटे दस्तावेज तयार करून कॉम्पलेक्समधील गाळ्यांवर ताबा मिळविल्याप्रकरणात कंत्राटदाराच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध हिंगणघाट पोलिसांत ३० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पना अमोल वझरकर या मृगनयनी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. (रा. न्यू नरसाळा नागपूर) या कंपनीच्या संचालक आहेत. त्यांनी हिंगणघाट शहरातील श्रद्धा बिझीप्लेक्स कॉम्पलेक्स बांधले होते. कॉम्पलेक्समधील दुकानांची देखरेख ठेवण्यासाठी व विक्री करण्यासाठी विवेक विजय कुमार कांबळे यांना ठेवले होते. मात्र, विवेक कांबळे याने आरोपी शेख इरफान शेख जब्बार, मोहम्मद युसूफ मोहम्मद हातम, वसीम शेख, मुस्ताक खान सुभान खान पठाण, उल्हास नगराळे यांच्याशी पूर्ण व्यवहार न करता विवेक कांबळे याने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना दुकानाचे कुलूप तोडून अवैधरीत्या दुकानावर ताबा दिला. हा प्रकार लक्षात येता कल्पना वझरकर यांनी हिंगणघाट पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली.