वर्धा : डायरीत तुझे नाव आहे. तू जे पैसे घेतले ते परत कर, असे म्हणत वारंवार पैशाची मागणी करुन वयोवृद्ध डॉक्टरला ब्लॅकमेल करीत त्यांच्याकडून तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळली. ही घटना सावंगी मेघे परिसरातील वैद्यकीय वसाहतीत घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसात १४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
डॉ. प्रदीप श्रीराम पाटील (६०) हे वैद्यकीय महाविद्यालयात प्राेफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना १० मे २०२२ मध्ये नागपूर येथील विनोद मोहन मोरे याचा फोन आला आणि चिल्ली पांडे यांच्या डायरीत तुझे नाव आहे. चिल्ली पांडे पासून जे १ लाख रुपये तू घेतले ते पैसे माझे आहे. असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी केली.
१० मे २०२२ ते २९ डिसेंबर २२ पर्यंत वारंवार पैशांची मागणी करून विनोदने डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडून तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळली. अखेर याबाबतची तक्रार डॉ. पाटील यांनी सावंगी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी नागपूर येथील आरोपी विनोद मोहन मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.