हिंगणघाट (वर्धा) : देशभरात धुमाकूळ घालणारी इराणी ‘गँग’ विविध राज्यांतील पोलिसांच्या रडारवर होती. हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान या गँगमधील एका आरोपीस अटक केली. त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल व विदेशी चलन जप्त केले.
चौकशीदरम्यान इराणी टोळीने देशातील विविध राज्यांत गुन्हे केल्याचे तपासत उघड झाले असून, १० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. मोहम्मद अली वल्द गुलाम हुसैन (४५) रा. इराण ह.मु. कृष्णा मार्केट लजपतनगर, दिल्ली असे या गँगमधील अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
धोत्राकडून हिंगणघाटकडे के.ए.०२ एम.के. ०७४४ क्रमांकाच्या चारचाकीतून ईराणी आरोपी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हैद्राबाद-नागपूर नॅशनल हायवे ४४ वर नाकाबंदी केली. भरधाव कार हैद्राबादकडून नागपूरकडे जाताना दिसली. पोलिसांनी बॅरिगेट्स लावून कारची अडवणूक करुन आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात शेखर डोंगरे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, वाहतूक शाखेचे नितीन राजपूत, जगदीश चव्हाण यांनी केली.
९.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
इराणी टोळीतील आरोपीकडून बनावट नंबरप्लेटची के.ए. ०२ एम.के. ०७४४ क्रमांकाची कार, विदेशी चलन, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक महागड्या वस्तू असा एकूण ९ लाख ५४ हजार १३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.
विविध राज्यांत चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त
आरोपीने देशातील विविध राज्यांत १० गुन्हे केल्याचे पुढे आले. आरोपी हा मूळचा इराण देशाचा रहिवासी आहे. त्याने मध्यप्रदेश, कनार्टक, रत्नागिरी, पुणे, चिमूर, वरोरा, वर्धा आदींसह विविध राज्यातील विविध गावांत हातचलाखीने गुन्हे केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केले आहे. सर्व दाखल गुन्ह्यातील एफआयआर पोलिसांनी प्राप्त केल्या आहेत. इतर राज्यातही आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.