लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी/तळेगाव (श्या. पत.): राज्य शासनाने अमरावती-नागपूर या महामार्गावरील तळेगाव (श्याम. पंत) या ठिकाणी ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर करून आर्वी विधानसभेतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली होती. त्यानंतर या रुग्णालयाकरिता जागेचा शोध सुरू होता. अखेर तळेगावलगतच्या काकडदरा येथील दहा हेक्टर जागेला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांनी दिली.
आर्वी विधानसभा मतदारसंघात आर्वी तालुक्यासह कारंजा आणि आष्टी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील तळेगाव (श्याम. पंत) हे महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे शासकीय रुग्णालयाची मागणी होती. याकरिता पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने ३०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी देत दिवाळीमध्ये आरोग्यदायी भेट दिली होती. त्यानंतर या शासकीय रुग्णालयाकरिता जागेचा शोध सुरू झाला. जागेची पाहणी झाल्यानंतर तळेगावलगतच्या काकडदरा येथील जागा निश्चित करण्यात आली असून, त्या जागेच्या मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंजूर करून आर्वीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आष्टीच्या तहसीलदारांना देण्यात आला.
त्या आदेशानुसार काकडदरा येथील शासकीय सर्व्हे क्रमांक ४३/१ आराजी ४०.०७ हेक्टर आरमधील १० हेक्टर आर म्हणजेच २५ एकर जागा देण्यास मंजुरी दिली आहे. ही जागा ३०० खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांना मंजूर केल्याचे आदेशात नमूद केले आहे.
लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाने आधीच ३०० खाटांच्या शासकीय रुग्णालयाला मंजुरी व आता त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेला मंजुरी मिळाल्याने रुग्णालयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. येत्या काही दिवसांत शासनाकडून निधी उपलब्ध करून घेत रुग्णालयाच्या कामालाही लवकरच गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. या शासकीय रुग्णालयामुळे आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांसह नागपूर व अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांनाही आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. ३०० खाटांचे रुग्णालय होणार असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे, हे खरच.
"नागरिकाच्या मागणी अंती पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने तळेगाव (श्याम. पंत) येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर केले. त्यानंतर जागेचाही प्रश्न आता निकाली निघाला आहे. या रुग्णालयाकरिता काकडदरा येथील दहा हेक्टर जागा मंजूर केली आहे. हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता शासनाने निधी मंजूर केला की या कामाला झपाट्याने सुरुवात होईल."- सुमित वानखेडे, वर्धा, लोकसभा प्रमुख