चैतन्य जोशी
वर्धा : वर्ध्यात सुरू असलेल्या पटवारी परीक्षेदरम्यान तांत्रिक सहायकाने लॅपटॉप केंद्राबाहेर लॅपटॉप आणल्याने परीक्षा केंद्रावर चांगलाच गाेंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच याची माहिती जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांना दिली.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहरातील तानिया कॉम्प्युटर लॅबमध्ये सोमवारी (२१ ऑगस्ट) रोजी पटवारी परीक्षा होती. पहिल्या बॅचच्या परीक्षेदरम्यान परीक्षा घेणाऱ्या टीसीएस एजन्सीचा तांत्रिक सहायक अचानक लॅपटॉप घेऊन परीक्षा केंद्राबाहेर निघाला. परीक्षा केंद्रावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याची नजर चुकवून तांत्रिक सहायक लॅपटॉप घेऊन परीक्षा केंद्राबाहेरील एका गल्लीत गेला. तांत्रिक सहायकाला लॅपटॉप घेऊन असल्याचे पाहून बाहेर उभ्या दुसऱ्या तुकडीच्या उमेदवारांनी गोंधळ घातला.
वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच महिला पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित तांत्रिक सहायकाला तातडीने केंद्रात परतण्यास सांगितले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना विचारणा केली असता त्यांनी परीक्षा केंद्रातून लॅपटॉप केंद्राबाहेर गेल्याची तक्रार प्राप्त होताच याची माहिती जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांना दिली असल्याचे सांगितले.
लॅपटॉप बाहेर नेल्याची तक्रार प्राप्त होताच केंद्राची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्हीचीही तपासणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची माहिती परीक्षा एजन्सी टीसीएस आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्या परीक्षेचा ड्राइव्ह डाऊनलोड केला जातो. हे काम परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी केले जाते. कोण-कोण परीक्षा देणार, याची माहिती त्या ड्राइव्हमध्ये असते. परीक्षा एजन्सीच्या व्यक्तीने परीक्षा केंद्रात जॅमर लागून असल्याने ड्राइव्ह डाऊनलोड करण्यासाठी बाहेर आल्याचे सांगितले.
- दीपक कारंडे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.