चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गावठी दारूसह बनावटी दारूची प्रकरणे जिल्ह्यात काही नवीन नाहीत, यात भर पडली ती मॅफेड्रॉन ड्रग्सची, गुन्हेगारीला प्रवृत्ती देणाऱ्या शह देणाऱ्या हिंगणघाट शहरात याची पाळेमुळे घट्ट होत असल्याचे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारावाईतून दिसून आली आहे. गत अकरा महिन्यांत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ५२.३६० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले असून, २२ लाख ७० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरून जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.
वर्धा शहरात व शहराला लागून मोठी महाविद्यालये, विद्यापीठ आहे. येथे शिक्षणासाठी बाहेर गावातून, जिल्ह्यातून, राज्यातून विद्यार्थी दाखल होता. मौज करण्याच्या नावाखाली या अमली पदार्थाचे सेवन केले जाते. सावंगी परिसरात बंद खोल्यांच्या आत पार्टीच्या नावाखाली हुक्का पार्त्याही रंगल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. त्यातच आता नशा करण्यासाठी महानगरात चलती असणाऱ्या मॅफेड्रोन ड्रग्सची क्रेझ वाढत आहे. गत अकरा महिन्यात पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५२.३६० ग्रॅम ड्रग्ससह २२ लाख ७० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अलिकडे वाढत्या एमडी ड्रग्जच्या कारवाईने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे रॅकेट सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची पाळेमुळे शहरालगत असलेल्या मोठ्या महानगरासह, परराज्यांत खोलवर रुजल्याचे अलिकडे केलेल्या कारवाईतून दिसून आले होते. विशेष म्हणजे तरुण तरुणींनाही या व्यसनाची चटक लागली आहे. या अमली पदार्थ्यांच्या विक्रीचे रॅकेट उखडून टाकण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत झाली तिप्पट वाढदोन वर्षापूर्वीपर्यंत मॅफेड्रोन ड्रग्स केवळ महानगरात नशेसाठी वापरत असल्याचे ऐकीवात होते. मात्र, गत वर्षी पहिल्यांदा जिल्ह्यात कारवाई करीत १७ ग्रॅम ७० मिलीग्रॅम ड्रग्स जप्त केले होते, तर गत अकरा महिन्यांत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५२.३६० ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले. जप्त केलेले ड्रग्सचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. मात्र, याचा पुरवठा कोण-कोण करतो, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.
पोलिसांपुढे तगडे आव्हानड्रग्सची पाकिटे लहान असल्याने ते सहज घेऊन जाणे शक्य आहे. यात महाविद्यालयीन युवक, सर्वसामान्य व्यक्ती सहज सोबत घेऊन जात असल्याने तसेच ही व्यक्ती पोलिसांच्या रेकॉर्डवर नसलेल्यामुळे याची सहज वाहतूक शक्य असल्याचे बोलले जात आहे. यामुळे याची रोकथाम करने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
ही ठिकाणे बनलीय नशेखोरांचे अड्डेरात्रीच्या सुमारास ओसाड रस्ते, मोकळे मैदान आणि शहरातील नामवंत टेकड्या नशेखोरांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. शहरात ठिकठिकाणी सहज उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांमुळे तरुणाईला नशेची चटक लागली आहे. अमली पदार्थांपैकी एक गांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. संगती गुणांनी पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.