हिंगणघाट : तालुक्यातील एका गावातील १५ वर्षे सहा महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत मामानेच अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीने आईसह पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यात आरोपी चुलत मामाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आई, वडील शेतावर गेल्यानंतर घरी येऊन अत्याचार केल्याचे म्हटले आहे. त्यावेळी ती ओरडली होती. मात्र, कुटुंबीय व शेजारी शेतावर गेल्याने कोणालाच तिचा आवाज ऐकू गेला नाही.
त्यानंतर चुलत मामाने तिला कोणाला काही सांगू नको, नाही तर मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. सायंकाळी आई, वडील, भाऊ घरी परतल्यानंतर तिने भीतीमुळे कोणाला काही सांगितले नाही. नंतर दोन दिवसांनी आणि जानेवारीमध्ये चुलत मामाने पुन्हा तिच्या घरी येऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २५ जूनला तिच्या पोटात दुखत असल्याने तिने आईला सांगितले. आईने तिला उपचाराकरिता एका रुग्णालयात आणले. तेव्हा डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केल्यानंतर ती १८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. मुलीचे वय कमी असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.
दवाखान्यातील एका कर्मचाऱ्याने मुलगी व तिच्या आईसह पोलिस स्टेशन गाठले. तेथे पोलिसांनी विचारपूस करीत वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरिता नेले. तेथे तिने चुलत मामाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(एन), ३७६ (२)(जे), ३७६ (३), ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार सहकलम ४, ६, १० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशीसाठी हे प्रकरण हिंगणघाट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.