वर्धा : देवळी येथे सोमवारी घडलेल्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले आहे. मंगळवारच्या सकाळी देवळीकर जनेतेनी माजी खासदार रामदास तडस यांची नेतृत्वात पोलीस स्टेशनवर धडक दिली. उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांना निवेदन देवून गुन्हेगार राहत असलेली अवैध वस्ती ताबोडतोब उठविण्यात यावी, अशी मागणी लावून धरली.
तसेच सोनेगाव आबाजी गावातील लोकांनी व देवळीतील शेकडोच्या संख्येतील जमावाने अवैध झोपडपट्टीवर चाल केली. झोपडपट्टीतील गुन्हेगारांना ताब्यात द्या, तसेच झोपडपट्टी हटविण्याची मागणी लावून धरण्यात आली. तसेच पुलगाव चौकात रस्ता रोको आंदोलन करून देवळी पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध करणयात आला. जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक आंदोलकांना भेट देत नाही, तसेच झोपडपट्टी हटत नाही, तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. यादरम्यान मृतकाचे तसेच गंभीर जखमी महिलांचे कुटुंबीय तसेच सोनेगाव येथील लोकांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाला धार दिली आहे. चक्काजाम आंदोलन तीव्र करण्यात येत आहे.