सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दक्षिण आफ्रिकेमध्ये समता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये सेवाग्राम आश्रमचे सेवाधिकारी जालंधरनाथ यांनीही सहभाग नोंदविला. या यात्रेदरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांच्या दोन मूर्ती साकारल्या.
दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी यांना रेल्वेच्या डब्यातून साहित्यासह बाहेर फेकण्यात आले होते. रंगभेदाचा कटू अनुभव बापूंना आला होता. या घटनेला १३० वर्षे झाली असून, महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ समता पदयात्रा काढण्यात आली होती. जगातील रंगभेद नाहीसा व्हावा, जय जगतचा नारा विश्वात गुंजावा यासाठी २३ एप्रिल ते ३ ऑगस्ट यादरम्यान ही यात्रा काढण्यात आली होती.
जवळपास दीड हजार किलोमीटर चाललेल्या या यात्रेमध्ये सेवाग्राम आश्रमचे सेवाधिकारी जालंधरनाथ, अभियांत्रिकी पदविकाधारक नितीन एस. व राजस्थान येथील माजी शिक्षणाधिकारी गोपाल शरण हेही सहभागी झाले होते. या यात्रेदरम्यान जालंधरनाथ यांनी टॉलस्टाय फार्म आणि हिडनबर्ग या ठिकाणी महात्मा गांधी यांचे दोन पुतळे (मूर्ती) साकारले. त्यांचीही आठवण आता दक्षिण ऑफ्रिकेत कायम राहणार आहे.
सेवाग्राम आश्रमात सन्मान
आश्रमातील सेवेकरी जालंधरनाथ ही यात्रा आटोपून सेवाग्राम आश्रमात पोहोचताच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सूतमाळा आणि खादीचे वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशा बोथरा, तर प्रमुख अतिथी म्हणून मंत्री प्रदीप खेलूरकर उपस्थित होते. याप्रसंगी आशा बोधरा आणि प्रदीप खेलूरकर यांनीसुद्धा गांधीजींचे विचार आपल्या देशासाठीच नाही, तर सर्व देश एक होऊन परिवार भावनेने समस्यांवर संवादातून मार्ग काढण्यासाठी आज प्रासंगिक आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन सिद्धेश्वर उंबरकर यांनी केले.
आजही बापूंवरील विश्वास कायमच
दक्षिण आफ्रिकेत या समता पदयात्रेतून फिरत असताना बॅनरवरील फोटो पाहून तेथील लोकांना खूप आनंद होत होता. सर्वांनीच चांगले सहकार्य केले. ही यात्रा जनाधारित असल्याने आर्थिक मदतही आपापल्या परीने केली. आजही गांधीजींवर लोकांची श्रद्धा असल्याचे जालंधरनाथ यांनी यावेळी सांगितले.
-------------------------------------------
08 whph-01- आश्रमातील सेवेकरी जालंधरनाथ
08 whph-01- दक्षित आफ्रिकेत बापूंची मूर्ती साकारताना जालंधरनाथ.