महेश सायखेडे
वर्धा : समुद्रपूर तालुक्याच्या ताडगाव शिवारात एका शेतकऱ्यास गतप्राण करणाऱ्या वाघाची सध्या दसोडा, धामणगाव, वानरचुवा, ताडगाव शिवारात मूव्हमेंट आहे. परिणामी, मानव व वन्यजीव संघर्ष टाळता यावा, या हेतूने परिसरातील दहा गावांमधील नागरिकांना वनविभागाच्या वतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
एखाद्या चित्रपटात अभिनेता रजनीकांत जसा रुबाब दाखवितात, तसाच रुबाबदार हा तरुण नर वाघ आहे. इतकेच नव्हे तर तो सीमावर्ती परिसरात राहणारा असल्याचे वनविभागाच्या सूक्ष्म निरीक्षणात पुढे आले आहे. एरवी वाघ रात्रीला मूव्हमेंट करतात. पण जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असल्याने आणि थांबून थांबून पाऊसही होत असल्याने वातावरणात गारठा आहे. त्यामुळे हा वाघ दिवसाही मूव्हमेंट करीत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.
टायगरच्या मागावर सात चमू
लिविंग इन बॉर्डर एरियात वास्तव्य करणाऱ्या या वाघाने ताडगाव शिवारात एन्ट्री करून एका शेतकऱ्यास गतप्राण केल्याने त्यास तातडीने पिंजराबंद करण्याची मागणी करण्यात आली. याच मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून या वाघाला पिंजराबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या वाघाच्या मागावर सध्या सहा चमू असून त्यात एसटीपीएफची एक, चंदपूर जिल्ह्याच्या चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या दोन तर वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या तीन चमूंचा समावेश आहे.
वॉच ठेवण्यासाठी होतोय ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर
संबंधित नर वाघाच्या हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव, दसोडा, धामणगाव परिसरात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आवश्यक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक चोवीस तासांनी ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्रांचे निरीक्षण तज्ज्ञांकडून करून या वाघाला पिंजराबंद करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे. लवकरच या वाघाला पिंजराबंद करण्यात येईल असा विश्वास प्रत्यक्ष जंगल परिसरात गस्त घालणाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
सीमा ओलांडल्यावर ६०० हेक्टरचा जंगल परिसर
वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील परिसरात मूव्हमेंट असलेला हा वाघ वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर या वाघाने वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडली तर त्यास सुमारे ६०० हेक्टरचा जंगल परिसर मूव्हमेंटसाठी मिळणार आहे.
युद्धपातळीवर पटवली जातेय ओळख
वर्धा जिल्ह्याच्या ताडगाव परिसरात एन्ट्री करून एका शेतकऱ्यास गतप्राण केलेला हा वाघ वर्धा जिल्ह्यातील की चंद्रपूर जिल्ह्यातील याची इत्थंभूत माहितीही सध्या वनविभागाच्या वतीने घेतली जात आहे. सुरुवातीला हा वाघ काही ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची काही छायाचित्रे वनविभागाला प्राप्त झाली आहेत. याच छायाचित्रांच्या मदतीने वाघाची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
टायगर चार वर्षे वयोगटातील
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव शिवारात एका शेतकऱ्यास ठार केल्यावर या साडेतीन ते चार वर्षे वयोगटातील तरुण वाघाने दसोडाच्या दिशेने कूच केली. याच दरम्यान त्याने संरक्षित वनात एका जंगली वराहाला ठार करून त्यावर ताव मारला. त्यानंतर या पट्टेदार वाघाने दसोडा शिवारात बैलाला गतप्राण केले. तर सध्या त्याची मूव्हमेंट दसोडा, धामणगाव, वानरचुवा, ताडगाव परिसरात असल्याने या गावांसह मंगरूळ, खेक, सिल्ली आदी गावांमधील नागरिकांना खबरदारीच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. नागरिकांनीही वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.