कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य नगरी (वर्धा) : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद नाही. वातावरण विषात्मक बनवून परस्पर अविश्वास व जाती-जातीत, धर्मा-धर्मांत भयाचे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. सरकारी पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात असल्याने सध्या घोषित नाही, तर अघोषित आणीबाणीचा काळ निश्चितच आहे, असा घणाघात विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य नगरीतील फुले-शाहू-आंबेडकर विचारपीठावरून केला.
मराठी साहित्य संमेलनात आधी ५० लाख, नंतर २ कोटी रुपये असे खोक्यावर खोके प्राप्त झाले. त्यामुळे मराठी साहित्य संमेलन म्हणजे खोक्यावर खोके संमेलन आहे, असे मत वानखेडे यांनी सकाळी विचार यात्रेदरम्यान व्यक्त केले. संमेलनात तासाभराच्या भाषणातून त्यांनी ‘संघ, उर्फी जावेद, लव्ह जिहादसह हिंदुत्व’ आदींबाबत चांगलीच झाडाझडती घेतली.
१७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका व सिनेअभिनेत्री रसिका आगासे-अय्युब यांच्या हस्ते झाले. विचारपीठावर संमेलनाध्यक्षांसह मावळते अध्यक्ष गणेश विसपुते, स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी, ज्ञानेश वाकुडकर आदींची उपस्थिती होते.