साहूर (वर्धा) : येथील भूमिहीन शेतमजूर विधवा लता प्रभाकर वडस्कर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील धान्य, पैसे व कपडे आदी साहित्य जळून कोळसा झाला. यामुळे लता वडस्कर यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली असून, ही घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली.
लता वडस्कर या स्थानिक गुरुदेव चौक परिसरात माती-कवेलूच्या घरात राहतात. सुमारे ११ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. शेतमजुरी करणाऱ्या लतासह लताचा मुलगा व वयोवृद्ध आई-वडिलांसाठी निवारा असलेल्या याच माती-कवेलूच्या झोपडीला सोमवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बघता-बघता घरातील संपूर्ण साहित्याला आगीने आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने वडस्कर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
२७ हजारांची रोख झाली कोळसा
घटनेच्या वेळी लता वडस्कर या शेतात मजुरी कामासाठी गेल्या होत्या. तर म्हातारी आई एकटी घरी होती. आग लागल्याचे लक्षात येताच आरडा-ओरड करण्यात आली. दरम्यान, परिसरातील नागिरकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी आगीत घरातील २७ हजार रुपयांची रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे लता यांनी शस्त्रक्रियेसाठी या रोख रकमेची जुळवाजुळव केली होती.
विदारक परिस्थिती बघून लता बेशुद्ध
घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर लता यांनी तातडीने घर गाठले. शस्त्रक्रियेसाठी जुळवाजुळव केलेली रोख रक्कम व घरातील संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णत: कोळसा झाल्याचे विदारक चित्र बघताच लता यांची शुद्ध हरपली. लता यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...अन् अधिकाऱ्यांनी गाठले घटनास्थळ
आगीची माहिती मिळताच महावितरणचे अभियंता अक्षय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच मंडळ अधिकारी प्रवीण हाडे यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला शिवाय घटनेची माहिती तहसीलदार सचिन कुमावत यांना दिली. संबंधित महिलेला तातडीने धान्य उपलब्ध करून देण्यासह शासकीय निकषांप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन तहसीलदार सचिन कुमावत यांनी दिले आहे.
चुलीजवळ बसली अन् आगीत भाजली
पाणी गरम करण्यास ठेवून चुलीजवळ हातपाय शेकत बसली असतानाच पातळाला लागलेल्या आसीमुळे वयोवृद्धेला आग लागून ती भाजली. दरम्यान, तिच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. १५ रोजी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. गोदावरी माधव वैद्य (७६) रा. वैष्णवी कॉम्पलेक्स कारला रोड पिपरी असे मृतकाचे नाव आहे. गोदावरी ही नेहमीप्रमाणे चूल पेटवून त्यावर पाणी गरम करीत होती. दरम्यान, ती तेथेच हातपाय शेकत बसली. हातपाय शेकत असतानाच तिच्या अंगावरील पातळाला आग लागली ती आग विझवत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले. यात तिचा उजवा पाय, उजवा हात, पोट भाजल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. १४ रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्याची माहिती दिली.